यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल या जोडीने पर्थ कसोटीत इतिहास रचला आहे. Twitter
Published on
:
24 Nov 2024, 5:00 am
Updated on
:
24 Nov 2024, 5:00 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल या जोडीने इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीच्या दुसऱ्या डावात या जोडीने डावाची सुरुवात करताना भारतासाठी सर्वात मोठी भागीदारी केली. अशी कामगिरी करणारी ही भारताची पहिली जोडी ठरली आहे. त्यांच्या आधी सुनील गावस्कर आणि कृष्णम्माचारी श्रीकांत यांच्या नावावर या विशेष कामगिरीची नोंद होती. या दोन फलंदाजांनी 1986 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच भूमीवर सिडनीमध्ये 191 धावांची भागीदारी केली होती. तब्बल 38 वर्षांनंतर पर्थ येथे जैस्वाल आणि राहुल या जोडीने आता हे विशेष यश संपादन केले आहे. या दोन फलंदाजांनी कांगारू संघा विरुद्ध त्यांच्याच मैदानावर पहिल्या विकेटसाठी 201 धावांची विक्रमी भागीदारी केली आहे. (yashasvi jaiswal-kl rahul highest opening partnership)
राहुल आणि यशस्वी यांच्यातील 201 धावांची भागीदारी ही दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या SENA देशांमध्ये भारतासाठी तिसरी सर्वोच्च सलामीची भागीदारी आहे. या यादीत सुनील गावस्कर आणि चेतन चौहान पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांनी 1979 मध्ये ओव्हलवर इंग्लंडविरुद्ध 213 धावांची सलामी भागीदारी केली होती. तर, 1936 मध्ये विजय मर्चंट आणि मुश्ताक अली यांनी मँचेस्टरमध्ये इंग्लंडविरुद्ध 203 धावांची भागीदारी केली होती.
SENA देशांमधील भारतासाठी सर्वात मोठी सलामीची भागीदारी
213 : सुनील गावस्कर-चेतन चौहान : इंग्लंड (द ओव्हल-1979)
203 : विजय मर्चंट-मुश्ताक अली : इंग्लंड (मँचेस्टर-1936)
201 : यशस्वी जैस्वाल-केएल राहुल : ऑस्ट्रेलिया (पर्थ-ऑप्टस-2024)
191 : सुनील गावस्कर-ख्रिस श्रीकांत : ऑस्ट्रेलिया (सिडनी-1986)
165 : सुनील गावस्कर-चेतन चौहान : ऑस्ट्रेलिया (मेलबर्न-1981)
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच मैदानावर केलेली सर्वात मोठी सलामीची भागीदारी
201 धावा : यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल : पर्थ कसोटी (2024)
191 धावा : सुनील गावस्कर आणि कृष्णम्माचारी श्रीकांत : सिडनी (1986)
165 धावा : नील गावस्कर आणि चेतन चौहान : मेलबर्न (1981)
141 धावा : आकाश चोप्रा आणि वीरेंद्र सेहवाग : मेलबर्न (2003)
124 धावा : विनू मांकड आणि चंदू सरवटे : मेलबर्न (1948)
123 धावा : आकाश चोप्रा आणि वीरेंद्र सेहवाग : सिडनी (2004)
ऑस्ट्रेलियात 200 हून अधिक धावांची भागीदारी
323 : जॅक हॉब्स-विल्फ्रेड रोड्स : मेलबर्न (1912)
283 : जॅक हॉब्स-हर्बर्ट सटक्लिफ : मेलबर्न (1925)
234 : बॉब बार्बर-जेफ्री बॉयकॉट : सिडनी (1966)
223 : बिल अथे-ख्रिस ब्रॉड : पर्थ (वाका-1986)
203 : मायकेल आथर्टन-ग्रॅहम गूच : ॲडलेड (1991)
201 : यशस्वी जैस्वाल-केएल राहुल पर्थ (ऑप्टस-2024)
जैस्वालचे शतक-राहुलचे अर्धशतक
पर्थ कसोटीच्या दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी करताना यशस्वी जैस्वालने आपल्या कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक पूर्ण केले. टीम इंडियाला पहिला झटका राहुलच्या रूपाने बसला. त्याने कसोटी कारकिर्दीतील 16 वे अर्धशतक पूर्ण केले. मिचेल स्टार्कने त्याची विकेट घेतली. राहुलने 176 चेंडूंत 43.75 च्या स्ट्राइक रेटने 77 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून पाच चौकार आले.