Published on
:
24 Nov 2024, 7:29 am
Updated on
:
24 Nov 2024, 7:29 am
नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या नाशिकमधील सर्व मतदारसंघांच्या निकालात पहिल्या फेरीपासून महायुतीच्या उमेदवारांना 'लीड' मिळत गेल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे समर्थक, कार्यकर्ते मतमोजणी केंद्रावर पाहावयास मिळाले नाहीत. आघाडी जसजशी वाढत गेली तसतशी समर्थकांची गर्दी ओसरत गेल्याने प्रतिस्पर्धी उमेदवारांचे कार्यकर्ते, समर्थक समोरासमोर येण्याचा प्रसंगच उद्भवला नाही. परिणामी, कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. तसेच बंदोबस्तावरील पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.
शनिवारी (दि. २३) पंचवटीतील मीनाताई ठाकरे सभागृह, भाभानगर येथील गायकवाड सभागृह, सीबीएस येथील शासकीय कन्या विद्यालय आणि सिडकोतील छत्रपती संभाजी स्टेडियम येथे मतमोजणी झाली. मतमोजणी केंद्रांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांचे समर्थक, कार्यकर्ते समोरासमोर येऊ नये, यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती. त्यासाठी पक्षनिहाय वाहनतळ, उभे राहण्याची व्यवस्था केली होती. सकाळी आठपासून मतमोजणीस प्रारंभ झाला. मात्र, शहरातील तीनही मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली. त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्रावर गर्दी केली. मात्र, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, समर्थकांनी कानोसा घेत तेथून जाणे पसंत केले. दुपारी एकपर्यंत एकतर्फी निकाल लागत असल्याचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर महायुतीच्या समर्थक, कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून, ढोलताशांच्या गजरात विजयोत्सव साजरा केला. विरोधक गटांनी पहिलेच केंद्र सोडले असल्याने वादाचे प्रसंगही उद्भवले नाहीत. काही ठिकाणी उमेदवारांच्या निवासस्थानी, कार्यालयाबाहेर समर्थकांची गर्दी पाहावयास मिळाली. मात्र, पोलिसांनी तेथेही पोलिस बंदोबस्त कायम ठेवल्याने सुव्यवस्था कायम राहिली.
काँग्रेस कमिटीत फटाके फोडण्याचा प्रयत्न
निकालाचा कल स्पष्ट झाल्यानंतर ग्रामीण भागातील विजयी उमेदवारांच्या काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी रोडवरील काँग्रेस कमिटीच्या आवारात शिरून फटाके फाेडण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरील पोलिसांसह काँग्रेस कार्यकर्ते सुरेश मारू, राजकुमार जेफ व शिवाजी कहार यांनी विरोध करीत कार्यकर्त्यांना पक्ष कार्यालयाबाहेर रोखून ठेवले. त्यामुळे तेथे काेणताही अनुचित प्रकार घडला नाही.
अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी झाडाखाली, उद्यानात किंवा वाहनात बसून निकाल ऐकले. तर अनेकांनी सोशल मीडिया, निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ, बातम्यांमधून शहर-जिल्ह्यासह राज्याचा कल जाणण्याचा प्रयत्न केला. यावेळी निकालाच्या चर्चेतही लाडकी बहीण योजना, बसप्रवासात अर्धे तिकीट यामुळे महिलांनी महायुतीला पसंती दिल्याचा सूर