शेवगाव-पाथर्डीत आ. मोनिका राजळेंचा डंकाPudhari
Published on
:
24 Nov 2024, 7:32 am
Updated on
:
24 Nov 2024, 7:32 am
शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील मतदारांनी आ. मोनिका राजळे यांना विजयाचा कौल देऊन मोठ्या मताने विजय केले. आ. राजळे यांनी तिसर्यांदा विधानसभेची निवडणूक जिंकून विजयाची हॅटट्रिक केल्याने एक नारी सबसे भारी... अशी चर्चा होत आहे.
निवडणूक आखाड्यामध्ये आ. राजळे यांनी जोरदार बॅटिंग करून विरोधकावर मात केली आहे. निवडणुकीतील विजयाचे सर्व गणिते बदलून अपक्ष उमेदवार माजी आमदार चंद्रशेखर घुले, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अॅड. प्रतापराव ढाकणे यांना धोबीपछाड केले. जनशक्तीच्या हर्षदा काकडे यांनाही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात चितपट केले. संयमी, शांत, मितभाषी, मतदारसंघातील विकास कामे व जनसंपर्क याच्या जोरावर तिसर्यांदा आमदारकी आपल्याकडे ठेवण्यात त्यांना मोठे यश मिळाले आहे.
शेवगाव-पाथर्डी व आधीचा शेवगाव-नेवासा या मतदार संघात गेल्या 50 वर्षांपासून तिसर्यांदा निवडून येण्याचा बहुमान कोणत्याही उमेदवारांना मिळाला नाही. मात्र आ. राजळे या मतदारसंघातून तिसर्यांदा निवडून आल्याने त्यांचा विक्रम झाला आहे.
निवडणूक प्रचारादरम्यान सर्व विरोधकांनी राजळे यांना लक्ष केले होते. जातीपातीचे राजकारण, मतविभागणी असा बोभाटा झाला. मात्र, मतदारांनी त्याला थारा न देत आ. राजळे यांच्यावर विश्वास व्यक्त केला. मतमोजणी चालू होताच शेवगाव तालुक्यातून अपक्ष उमेदवार माजी आ. चंद्रशेखर घुले यांनी मतात आघाडी घेतली.
परंतु त्यांना अपेक्षित अशी मते न मिळाल्याने 13व्या फेरीपासून आ. राजळे यांना आघाडी मिळत गेली. शेवगाव शहरातूनही त्यांना सुमारे 3 हजार 800 मताधिक्य मिळाले. अॅड. प्रताप ढाकणे यांनाही अपेक्षित मतदान मिळत गेले नाही. त्यामुळे 21व्या फेरीअखेर राजळे 25 हजार 467 मतांचे मताधिक्य राहिले आणि त्या 11 हजार 367 मतांनी आघाडीवर राहिल्या.
पाथर्डी तालुक्यात भालगाव व टाकळीमानूर गटात प्रताप ढाकणे यांना चांगली मते मिळतील अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. मात्र, या दोन्ही गटात राजळेंना मिळालेली मते लक्षणीय ठरली. राजळे यांचे मताधिक्य जसे वाढत गेले तसा कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. राजळे यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांच्या आतषबाजीत आनंदोत्सव साजरा केला.
आ. राजळे यांना मतदारसंघातील प्रत्येक गावातून मताच्या रूपाने मतदारांनी आशीर्वाद दिला. मतदारसंघात विशेषतः पाथर्डी तालुक्यात ज्या पद्धतीने निकालाचा अंदाज वर्तवला गेला तसा फारसा फायदा विरोधकांना त्याचा झाला नसून शेवगावबरोबर पाथर्डीनेही राजळे यांना अपक्षेप्रमाणे चांगली मते दिली. ज्या पद्धतीने अनेक तर्क-वितर्क आणि विजयाचे अंदाज बांधले गेले होते ते सर्व अंदाज खोटे ठरवत आ. राजळे यांनी पुन्हा एकदा मतदारसंघावर आपला डंका वाजवला आहे.
आ. राजळेंना नामदाराची संधी
सन 2014, 2019 आणि 2024 या तीन विधानसभेच्या निवडणुकीत आ. मोनिका राजळे यांनी प्रताप ढाकणे यांना पराभूत करून विजयाची हॅट्रिक केली. या सलग तिसर्या विजयाने आमदार मोनिका राजळे यांना मंत्रिपदाची संधी मिळून नामदार होणार याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.