नंदुरबार मतदारसंघात भाजपचे उमेदवार तथा आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी काँग्रेसचे उमेदवार किरण तडवी यांचा पराभव करीत आपले वर्चस्व कायम राखले आहेत.Pudhari News network
Published on
:
24 Nov 2024, 9:21 am
Updated on
:
24 Nov 2024, 9:21 am
नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांपैकी भाजपने आपले दोन्ही गड राखले, तर शिवसेना शिंदे गट व काँग्रसने प्रत्येकी एका मतदारसंघात विजय मिळविला. नंदुरबार, शहादा व अक्कलकुवा मतदारसंघांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळविला, तर नवापूर मतदासंघ राखण्यात काँग्रसेला यश मिळाले. त्यामुळे चारपैकी तीन मतदासंघांत महायुतीने विजय मिळत वर्चस्व सिद्ध केले.
नंदुरबार मतदारसंघात भाजपचे उमेदवार तथा आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी काँग्रेसचे उमेदवार किरण तडवी यांचा पराभव करीत आपले वर्चस्व कायम राखले आहेत. डॉ. गावित यांनी सलग सातव्यांदा विजय प्राप्त करून या मतदारसंघात विक्रम प्रस्थापित केला आहे. पक्षांतर्गत मोठी धुसफूस असतानाही त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविल्याने मतदारांनी त्यांच्या विकासकार्यावर विश्वास दर्शविल्याचे सिद्ध होत आहे.
अक्कलकुवा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार आमदार के. सी. पाडवी यांनी सलग सात वेळा निवडून येण्याचा विक्रम केल्याने हा मतदारसंघ काॅंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, यंदा शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषद सदस्य आमश्या पाडवी यांनी के. सी. पाडवी यांचा पराभव करीत त्यांच्या विजयाची मालिका खंडित करत काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. याबरोबरच लोकसभा निवडणुकीत नुकत्याच पराभूत झालेल्या भाजपच्या डॉ. हीना गावित यांनी भाजपचा राजीनामा देत या ठिकाणी अपक्ष उमेदवारी करून आव्हान उभे केले होते. मात्र, त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तसेच काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांनीही या मतदारसंघातून उमेदवारी केली. मात्र, त्यांना केवळ आठ हजार ६४० मते मिळाले.
शहादा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान उमेदवार आमदार राजेश पाडवी यांनी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र कृष्णराव गावित यांचा पराभव करत आपला गड कायम राखला. राजेंद्र गावित हे भाजपचे प्रदेश सदस्य होते. तथापि उमेदवारी मिळत असल्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ऐनवेळी भाजपतून आलेल्या पदाधिकाऱ्याला उमेदवारी दिल्याच्या नाराजीतून काँग्रेस पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती त्याचा परिणाम मतपेटीवर दिसला.
नवापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमदेवार आमदार शिरीष नाईक यांनी विजय मिळवत आपला गड कायम ठेवला. त्यांनी महायुती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार भरत गावित यांचा पराभव केला. या मतदारसंघात उपक्ष उमेदवार शरद गावित यांनीही चांगली लढत दिली. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
काँग्रेसच्या वर्चस्वाला सुरुंग
कधीकाळी नंदुरबार जिल्हा काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जात होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने अक्कलकुवा व नवापूर दोन जागांवर विजय मिळविला होता. मात्र, यावेळी काँग्रेसला केवळ नवापूरची जागा राखण्यात यश आल्याने काँग्रेसच्या गडाला महायुतीने सुरुंग लावल्याचे बोलले जात आहे.