गूगल मॅपमुळे पत्ता शोधून काढणे आजकाल फार सोपे झाले आहे. मात्र हाच गूगल मॅप उत्तर प्रदेशातील तिघांच्या जीवावर बेतला आहे. गूगल मॅपने चुकीचा रस्ता दाखवल्याने कार नदीत पडून तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जेसीबीच्या मदतीने कार बाहेर काढली. कारमधील तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.
काय आहे प्रकरण?
कारमधील तिघे तरुण नातेवाईकाच्या लग्नाला चालले होते. यासाठी त्यांनी लग्नस्थळी पोहचण्यासाठी गूगल मॅपची मदत घेतली. मात्र गुगल मॅपवर चुकीचा मार्ग दाखवण्यात आल्याने त्यांची कार पुलावरून रामगंगा नदीत पडली आणि तिघांचा मृत्यू झाला.
तिन्ही मृतांची ओळख पटली आहे. या अपघातात जीव गमावलेले विवेक आणि कौशल कुमार हे दोघे भाऊ असून त्यांच्यासोबतचा तिसरा व्यक्ती त्यांचा मित्र होता. त्याच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे.
पुलाचे काम अपूर्ण आहे. पुरामुळे पुलाचा पुढील भाग नदीत वाहून गेला, त्यामुळे भरधाव वेगात असलेली कार पुलावरून थेट खाली पडली. जेसीबीच्या सहाय्याने कार आणि तिन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. मयतांपैकी दोघे सख्खे भाऊ आहेत. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.