'लाडकी बहीण' ठरली यंदा गेमचेंजरPudhari News network
Published on
:
24 Nov 2024, 4:40 am
Updated on
:
24 Nov 2024, 4:40 am
नाशिक : नाशिक शहराचा सर्वांगीण विकास आणि राज्यात स्थिर सरकार प्रस्थापित व्हावे, महिला सुरक्षित व्हावी हे मुद्दे डोळ्यांसमोर ठेवूनच महायुतीमधील उमेदवारांच्या झोळीत मते टाकली. अनेक पक्षांचे खिचडी सरकार येऊ नये आणि स्थिर सरकारद्वारे राज्यासह नाशिकचा विकास व्हावा यासाठी महिलांनी महायुतीला भरभरून मते दिली, हा विजय हिंदुत्वाचा तसेच विकासनीतीचा असल्याच्या प्रतिक्रिया महिलांनी निकालानंतर दै. 'पुढारी'ला दिल्या.
नाशिकचा सर्वांगीण विकास आणि हिंदुत्व याच मुद्द्यांना घेऊन भाजपच्या उमेदवाराला मतदान केले. आता एकहाती सत्ता आल्याने राज्यासह नाशिकच्या विकासाला गती प्राप्त होईल, अशी अपेक्षा आहे. गुंडगिरी, हुकूमशाही आणि बदलणाऱ्या भूमिकांचा पराभव झाल्याचे निकालावरून दिसले.
चंदा सोनवणे, गृहीणी, पंचवटी
महायुतीचे सरकार येणार हे अपेक्षित होते. महिलांना स्थिर सरकार आणि विकास हवा आहे. नाशिकमध्ये सीमा हिरे आणि देवयानी फरांदे या लोकप्रतिनिधींनी तमाम नाशिककर महिलांचे नेतृत्व केले आणि यंदाही त्यांचाच विजय झाला याचा महिला म्हणून अभिमान आहे. आता नाशिकचा विकास जलद होईल.
उल्का मानकर, गृहिणी, गंगापूर रोड
नाशिकमध्ये भाजपचे तीनही उमेदवार विजयी होण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा हे मुख्य कारण ठरले. राज्य शासनाच्या महिलांसाठीच्या योजनांमुळेही भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांचा जनाधार वाढला. आता नाशिकमध्ये विकास आणि युवावर्गाला रोजगार वाढेल, अशी अपेक्षा.
प्रा. दिव्या सोनवणे, मखमलाबाद
लाडकी बहीण योजनेचा प्रभाव या निवडणुकीत सर्वाधिक राहिला. ती योजना नवीन सरकारनंतरही पुढे कायम सुरू राहावी, अशी सर्वच महिलांची इच्छा होती. त्यामुळेही महिलांनी मोठ्या प्रमाणावर महायुतीच्या पारड्यात मते टाकली.
रत्ना परदेशी, बळी मंदिर चौक, पंचवटी