Published on
:
24 Nov 2024, 2:10 am
Updated on
:
24 Nov 2024, 2:10 am
इचलकरंजी : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात गेल्या काही महिन्यांत वेगवान घडामोडी घडल्या. त्यानंतर डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांना भाजपची उमेदवारी मिळाली. त्यानंतर भाजपसह आवाडे गटाने केलेल्या सुक्ष्म नियोजनामुळे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मताधिक्याने निवडून येण्याची किमया डॉ. राहुल आवाडे यांनी साधली. महाविकास आघाडीचे मदन कारंडे यांना पराभवाचा धक्का बसला. राष्ट्रीय पातळीवरील अनेक दिग्गज नेत्यांची इचलकरंजीत सभा झाल्या, हिंदुत्वाचा मुद्दा प्रकर्षाने याठिकाणी मांडला गेला. महायुतीच्या उमेदवाराला लोकसभेप्रमाणे हाच मुद्दा फायदेशीर ठरला.
भाजपचे माजी आ. सुरेश हाळवणकर यांनी सुरुवातीला या जागेवर आपला हक्क सांगितला होता. त्यानंतर भाजपचे सहयोगी आ. प्रकाश आवाडे यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर इचलकरंजीतील राजकीय घडामोडी वेगवान झाल्या. भाजपच्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे इचलकरंजीत आले. त्यांनी आवाडे गट व भाजपच्या कार्यकर्त्यांना एकत्र काम करण्यासाठी आवाहन केले. माजी आ. हाळवणकर यांनीही आ. आवाडे यांच्याबरोबर सलोखा करीत डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रचारात झोकून देऊन काम केले. आवाडे भाजपमध्ये आल्यानंतर भाजपचे काही कार्यकर्ते नाराज झाले. परंतु, त्यांची संख्या नगण्य होती. पक्ष देईल तो उमेदवार, या संकल्पनेतून भाजपचे कार्यकर्ते घराघरांमध्ये कमळ चिन्ह घेऊन गेले. त्यांच्या जोडीला आवाडे यांचा ताराराणी पक्षही कामाला लागला. आ. प्रकाश आवाडे, माजी आ. सुरेश हाळवणकर यांनी केलेल्या सुक्ष्म नियोजनामुळे भाजपचा विजय सुकर झाला.
लोकसभा निवडणुकीत इचलकरंजी मतदारसंघातून सुमारे 39 हजारवर लिड खा. धैर्यशील माने यांना मिळाले होते. त्यामुळे या मतदारसंघाचा कौल हिंदुत्वाच्या दिशेनेच जाणार, हा सुरुवातीपासूनच अंदाज व्यक्त केला जात होता. महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे मदन कारंडे हे रिंगणात होते. लोकसभा निवडणुकीत नवखा उमेदवार असूनही सत्यजित पाटील यांनी चांगले मतदान घेतल्यामुळे महाविकास आघाडीचा विश्वास दुणावला होता. परंतु, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पडलेले मतदान पाहता विचारमंथन करण्याची गरज आहे. माजी पाणीपुरवठा सभापती विठ्ठल चोपडे यांनीही अपक्ष नशीब आजमावले. परंतु, दोन्ही दिग्गज उमेदवारांसमोर त्यांचा निभाव लागला नाही. इचलकरंजी विधानसभा निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा निर्णायक ठरला.
शरद पवार पावसात भिजले; पण...
शरद पवार पावसात भिजले की तेथील उमेदवार निवडून येतो, असा प्रत्यय श्रीनिवास पाटील यांच्या विजयानंतर सातारा येथे आला होता. इचलकरंजी येथे मदन कारंडे यांच्या प्रचारार्थ घोरपडे नाट्यगृह चौकात झालेल्या सभेतही शरद पवार यांनी पावसात भिजत भाषण केले. त्यामुळे मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाची मोठी हवा निर्माण झाली. परंतु, कारंडे यांच्या पराभवानंतर शरद पवार यांचे पावसात भिजणे व विजय, पराजय याचा काही संबंध नसल्याचेच दिसून आले. याबाबतची चर्चाही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत होती.