कराड : स्वातंत्र्यापासून आजवरच्या सर्वच विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना भरभरून मतदान करत विजयी करणार्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉ. अतुल भोसले जायंट किलर ठरले आहेत. त्यांनी तब्बल 39 हजार 355 मतांनी माजी मुख्यमंत्री विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा दारूण पराभव केला आहे. या पराभवामुळे काँग्रेसच्या आजवरच्या एकहाती वर्चस्वाला अक्षरशः सुरूंग लागला आहे.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात मतदानानंतर काँग्रेसचा बालेकिल्ला अबाधित ठेवण्यात यश येईल असा दावा काँग्रेसकडून केला जात होता, तर सुमारे 8 ते 10 हजारांनी विजय मिळेल, असा विश्वास भाजपाकडून केला जात होता. शनिवारी प्रत्यक्षात मतमोजणीस प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून डॉ. अतुल भोसले यांनी आघाडी घेतली आणि ही आघाडी शेवटपर्यंत कायम होती. पहिल्या फेरीत डॉ. अतुल भोसले यांनी आमदार चव्हाण यांच्यावर 1 हजार 590 मतांची आघाडी घेतली. दुसर्या फेरीत अतुल भोसले यांनी 1 हजार 34 मतांचे मताधिक्य घेतले. या फेरीत अतुल भोसलेंना मताधिक्य मिळाल्याने आमदार चव्हाण यांच्यासह अॅड. उदयसिंह पाटील यांना जबर धक्का बसला.
तिसर्या फेरीत मात्र आमदार चव्हाण यांना केवळ 816 मतांची आघाडी मिळाली आणि या फेरीतच आमदार चव्हाण यांच्या पराभवाची पहिली चाहूल लागली होती. चौथ्या फेरीत सवादे, बांदेकरवाडी, लटकेवाडी, घोगाव, येळगाव, गोटेवाडी, भरेवाडी, गणेशवाडी, ओंडोशी, चचेगाव आणि विंगमधील एका केंद्राचा समावेश होता. या फेरीत मताधिक्याची अपेक्षा असताना आमदार चव्हाण हेच 1 हजार 313 मतांनी पिछाडीवर पडले आणि हा अॅड. उदयसिंह पाटील यांना जबर धक्का होता. पाचव्या फेरीत विंग, शिंदेवाडी, वारूंजी, सैदापूर या गावांचा समोवश होता आणि या फेरीत सुद्धा अतुल भोसले यांनी 1 हजार 594 मतांची आघाडी घेतली. सहाव्या फेरीत गोवारेसह कराडमधील मतदान केंद्र क्रंमाक 120 पर्यंतचा समावेश होता आणि या फेरीत तब्बल 3 हजार 314 मतांची आघाडी घेत कराड शहरासह लगतच्या परिसरात सुद्धा अतुल भोसले यांनी मुसंडी मारल्याचे स्पष्ट झाले.
सातव्या फेरीत अतुल भोसले यांनी 7 हजार 530 तर आमदार चव्हाण यांना 4721 मते मिळाली. त्यामुळे कराडातील 20 केंद्रावर भोसले यांनी तब्बल 2 हजार 809 मतांची आघाडी घेत विजयाची औपचारिकताच बाकी होती. आठव्या फेरीत कराड शहरातील केंद्राचा समावेश होता आणि या फेरीत सुद्धा अतुल भोसले यांनी 1 हजार 188 मतांची आघाडी घेतली होती. नवव्या फेरीत कराडसह गोटे आणि मलकापूरमधील दोन केंद्राचा समावेश असूनही आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना केवळ 961 मतांची आघाडी मिळाली. दहाव्या फेरीत मलकापूरमधील 20 केंद्राचा समावेश होता आणि यातही आघाडी घेत मनोहर शिंदे यांना अतुल भोसले यांनी जोरदार झटका दिला. 11 व्या फेरीत मलकापूरच्या चार मतदान केंद्रांसह कार्वे, गोळेश्वर, कापीलमधील दोन केंद्राचा समावेश होता. या फेरीपर्यंत अतुल भोसले यांना 81 हजार 441 तर आमदार चव्हाण 65 हजार 615 मते मिळून आ. चव्हाण हे सुमारे 15 हजार 826 मतांनी पिछाडीवर होते.
बाराव्या फेरीत कापीलमधील दोन केंद्रासह कोडोली, नांदलापूर, जखिणवाडी, कोयना वसाहत, ओंड, थोरातमळा, कालेतील तीन केंद्राचा समावेश होता. तेराव्या फेरीत संजयनगर (काले), चौगुलेमळा, झुजारमळा, धोंडेवाडी, नारायणवाडी, कालेटेक, मुनावळे, नांदगावमधील तीन मतदान केंद्राचा समोवश होता. या फेरीत भोसलेंनी 2 हजार 662 मतांची आघाडी घेतली. चौदाव्या फेरीत नांदगाव, पवारवाडी, मनव, कालवडे, कासारशिरंबे, उंडाळे, शेवाळेवाडी, टाळगाव, साळशिरंबे, खुड्याचीवाडी आणि म्हारूगडेवाडी या गावाचा समावेश असून सुद्घा भोसले यांनाच 587 मतांचे मताधिक्य मिळाले. 15 व्या फेरीत जिंती, अकाईचीवाडी, येणपे, चोरमारवाडी, माटेकरवाडी, लोहारवाडी, आटके, वाठार आणि रेठरे खुर्द या गावांचा समावेश होता. या फेरीत अतुल भोसले यांनी 2 हजार 131 मतांचे मताधिक्य मिळविले.
16 व्या फेरीत मालखेड, बेलवडे बुद्रूक, दुशेरे, शेरे, थोरातमळा, संजयनगर शेरे, शेरे स्टेशन, वडगाव हवेलीतील 5 केंद्राचा समावेश होता. 17 व्या फेरीत वडगावमधील एका केंद्रासह शेणोली, गोंदी, रेठरे बुद्रूक, जुळेवाडी, शिवनगर या गावांचा समावेश होता. या फेरीत तब्बल 5 हजार 592 मतांचे मताधिक्य घेत विजयाची केवळ औपचारिकताच बाकी ठेवली होती. या फेरीपर्यंत भोसलेंना 1 लाख 36 हजार 843 तर पृथ्वीराज चव्हाण यांना 99 हजार 261 मते मिळाली होती. तर अखेरच्या 18 व्या फेरीत खुबी गावाचा समावेश होता आणि यातही 634 मतांचे मताधिक्य घेत अतुल भोसले यांनी मोठा विजयी मिळवला.