निकालानंतर फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी प्रचंड मोठा जल्लोष साजरा केला.Pudhari Photo
Published on
:
24 Nov 2024, 2:18 am
Updated on
:
24 Nov 2024, 2:18 am
पाटण : पाटण विधानसभा निवडणुकीत मंत्री शंभूराज देसाई यांनी आतापर्यंतच्या त्यांच्या मताधिकाचे सर्व विक्रम मोडीत काढत तब्बल 34,824 मताधिक्याने आपला विक्रमी विजय नोंदवला. शंभूराज देसाईना 1,25,759, अपक्ष सत्यजितसिंह पाटणकर यांना 90,935 तर महाविकास आघाडीच्या भानुप्रताप ऊर्फ हर्षद कदम यांना 9,626 मते मिळाली. निकालानंतर फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी प्रचंड मोठा जल्लोष साजरा केला.
येथील समाज कल्याण विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. प्रारंभी टपाली व सैनिकांची मते व त्याचदरम्यान ईव्हीएम मशिनद्वारे झालेल्या मतांची मोजणी सुरू झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी सोपान टोम्पे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अनंत गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय शांत व सुरळीतपणे ही मतमोजणी प्रक्रिया पार पडली. यामध्ये प्रमुख तीन उमेदवारांसह बसपाचे महेश चव्हाण यांना 455, वंचित आघाडीचे बाळसो जगताप 545, रिपाई ( अ ) गटाचे विकास कांबळे 261, राष्ट्रीय समाज पक्षाचे विकास कदम 91 तर अपक्ष प्रताप मस्कर 269, संतोष यादव 1299, विजय पाटणकर 351, सूरज पाटणकर 554 व नोटाला 1339 मते मिळाली. एकूण 2,31,484 मतांची मतमोजणी झाली.
एकूण 24 फेर्यांमध्ये ही मतमोजणी झाली. पहिल्या फेरीपासून शंभूराज देसाई यांनी मताधिक्यात आघाडी घेतली होती. फेर्यां दरम्यान मधल्या काळात तीन फेर्यात सत्यजितसिंह पाटणकर यांना देसाईंच्या मताधिक्यात काहीशी घट करण्यात यश मिळाले. मात्र सातत्याने एक ते चोवीस फेर्यात शंभूराज देसाईंची मताधिक्याची आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. मान्यवर पक्ष अपक्षांचे मतमोजणी प्रतिनिधींसह शासकीय अधिकारी व कर्मचार्यांकडून ही मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली. ज्या ज्या पद्धतीने फेरीनिहाय निकाल जाहीर होत होते त्या त्या पद्धतीने पाटण शहरात देसाई गटाच्या समर्थकांनी हळूहळू गर्दी करायला सुरुवात होती केली होती. साधारणतः बारा वाजल्यानंतर देसाई यांचा विजय निश्चित मानला गेल्यानंतर देसाई समर्थकांनी मतमोजणी केंद्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर घोषणा द्यायला सुरुवात केली. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी प्रचंड मोठा जल्लोष साजरा केला.
विजयाचे प्रशस्तीपत्र घेतल्यानंतर शंभूराज देसाई मतमोजणी केंद्राच्या बाहेर पडल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर घेत त्यांची जंगी मिरवणूक पाटणमधून काढण्यात आली. यापूर्वी 2014 ला देसाईंना सत्यजितसिंह पाटणकर यांच्याविरुद्ध 18 हजार तर 2019 ला 14 हजार मताधिक्य मिळाले होते. यावेळी त्यांनी स्वतःच्याच मताधिक्याची आघाडी मोडीत काढून 34,824 मताधिक्याचा विक्रम केला. शंभुराज देसाई यांच्या विजयाची बातमी समजताच मतदार संघातील अनेक गावात प्रचंड जल्लोष व विजयोत्सव साजरा करण्यात आला. मतमोजणी काळात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी उप विभागीय पोलिस अधिकारी विजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.