सचिन पाटील यांच्या विजयानंतर फलटणमध्ये जावून आ. जयकुमार गोरे यांनी माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर यांच्यासह केलेला जल्लोष. Pudhari Photo
Published on
:
24 Nov 2024, 2:07 am
Updated on
:
24 Nov 2024, 2:07 am
फलटण : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या फलटण-कोरेगाव मतदार संघात 17046 मतांनी आ. दीपक चव्हाण यांचा पराभव करुन राजे गटाला सुरुंग लावण्याचे काम राष्ट्रवादीच्या सचिन पाटील यांनी केले. या विजयाने फलटणमध्ये माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर यांचा करिष्मा दिसून आला असून विधानपरिषदेचे माजी सभापती आ. रामराजे ना. निंबाळकर बॅकफुटवर गेले आहेत. या निकालामुळे फलटण तालुक्यावर असलेल्या राजे गटाच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे.
फलटण येथील शासकीय धान्य गोदामात शनिवारी सकाळी 8 वा. मतमोजणीस सुरुवात झाली. प्रथम पोस्टल मतदान मोजायला घेतल्यानंतर ईव्हीएम मशीन खोलण्यात आल्या. 14 टेबलवर 26 फेर्यांद्वारे मतमोजणी झाली. या मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन पाटील यांना 1 लाख 19 हजार 287 मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे दीपक चव्हाण यांना 1 लाख 2 हजार 241 मते मिळाली. रासपचे दिगंबर आगवणे यांना 13 हजार 828, बीएसपीच्या प्रतिभाताई शेलार यांना 618, स्वाभिमानीचे प्राध्यापक रमेश आढाव यांना 1933, सनई छत्रपती शासनचे दीपक चव्हाण यांना 2157, वंचित बहुजन आघाडीचे सचिन भिसे यांना 1101 मते मिळाली. तर अपक्ष अमोल कारंडे 116, कांचन कनोजा खरात 364, कृष्णा काशिनाथ यादव 232 , गणेश नंदकुमार वाघमारे 139, चंद्रकांत उर्फ सचिन भालेराव 155, नितीन लोंढे 294, सूर्यकांत शिंदे 604 अशी मते मिळाली. फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघात ईव्हीएम मशीन व टपाली मते मिळून 2 लाख 44 हजार 571 जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी 1502 जणांनी नोटाचा वापर करून सर्वच उमेदवारांना नाकारले.
दरम्यान, मतमोजणीच्या पहिल्या फेरीत सचिन पाटील यांनी 235 मतांची आघाडी घेतली दुसर्या फेरीत ही आघाडी 1493 पर्यंत पोहोचली. सातव्या फेरीचा अपवाद वगळता प्रत्येक फेरीत ही आघाडी वाढतच गेली. मतमोजणीच्या झालेल्या 26 फेर्यांपैकी एका फेरीत दीपक चव्हाण आघाडीवर राहिले. त्याचबरोबर टपाली मतदानातही ते आघाडीवर राहिले. इतर फेरीत सचिन पाटील यांनी दीपक चव्हाण यांच्यावर वर्चस्व मिळवले.
फलटण-कोरेगाव मतदार संघाची निवडणूक दोन राष्ट्रवादीमध्ये झाली. आमदारकीचा तीन टर्मचा अनुभव असलेले दीपक चव्हाण यांना नवख्या सचिन पाटील यांनी धोबी पछाड दिली. सचिन पाटील यांच्या प्रचारासाठी माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर व त्यांच्या सुविद्य पत्नी जिजामाला ना. निंबाळकर, या उभयंतांनी स्टार प्रचारकांची भूमिका बजावली. त्यांनी नियोजनबद्ध प्रचार करुन विजय खेचून आणला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मतदारसंघात तीन सभा झाल्या. या सभेचा परिणाम या निकालातून दिसून आला. प्रल्हाद साळुंखे -पाटील, शिवरूपराजे खर्डेकर, बाळासाहेब सोळस्कर, जयकुमार शिंदे, स्व. सुभाषराव शिंदे यांच्या स्नुषा सौ. प्रतिभा शिंदे यांच्यासह अनेकांनी रणजितसिंह ना. निंबाळकर यांच्या गटाला केलेली साथ सचिन पाटील यांच्या विजयात मोलाची ठरली.
राजे गटाने दीपक चव्हाण यांना चौथ्यांदा निवडणूक रिंगणात उतरवले व त्यांची पाठराखण केली. त्यांना संजीवराजे ना. निंबाळकर, रघुनाथराजे ना.निंबाळकर यांच्यासह खा. धैर्यशील मोहिते पाटील व खा. शरद पवार यांचीही साथ मिळाली. यापूर्वी चिमणराव कदम व आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी विजयाची हॅटट्रिक केली होती. दीपक चव्हाण यांचीही विजयाची हॅटट्रिक झाली होती. तालुक्याचा आजवरचा इतिहास पाहता चौथ्यांदा कोणीही आमदार झाले नव्हते. हा इतिहास आ. दीपक चव्हाण यांच्या पराभवाने कायम राहिला. रामराजे यांची अदृश्य शक्ती दीपक चव्हाण यांच्या कामी आली नाही हे या पराभवाने अधोरेखित झाले.