>> कल्पिता हातोडे
प्रवासवर्णन या स्वतंत्र साहित्यकृतीचे सखोल अभ्यासपूर्ण स्वरूप व वैशिष्ट्ये सिद्धहस्त लेखिका मृदुला मसूरकर यांच्या ‘रम्य ती भ्रमंती’ या प्रवासवर्णनपर पुस्तकातून विषद केली आहे. त्यांनी केलेले परदेशगमन व तेथील वास्तव्यातील अनुभव, त्यांनी देश, काल, परिस्थिती, महती व विविध अनुभव यांचे वस्तुनिष्ठपणे केलेलं कथन वाचकांच्या पसंतीस उतरेल.
लेखिकेच्या साहित्यिक, पत्रकार, पर्यटक आदी व्यक्तिमत्त्वांबरोबर त्या सामाजिक क्षेत्राशी निगडित असल्याचा प्रत्यय येतो समुद्रसपाटीपासून सात ते आठ हजार फूट उंचीवरील पठारावरच्या यलो स्टोन नॅशनल पार्क पासून सुरु झालेला या पुस्तकाच्या प्रवासवर्णनाचा प्रवास अद्भुतरम्य क्षणांची बरसात करून वाचकांना शेवटच्या पानापर्यंत खिळवून ठेवतो.
कुठलीही अतिशयोक्ती टाळून अविस्मरणीय घटनांचा उल्लेख करताना इतिहासाची धरलेली कास एक आठवणींचा नजाराच आहे. रोमन बाथ्सवर विस्तृतपणे लिहिताना लेखिकेच्या वास्तुविशारद पारंगततेची आणि व्यावसायिकदृष्टय़ा प्रगल्भतेची जाणीव करून देते.
हे प्रवासवर्णन वाचताना प्रत्यक्ष ते ते ठिकाण अनुभवायचा आभास झाल्याशिवाय राहत नाही. अमेरिका-कॅनडा सीमेवरील नायगारा वॉटरफॉल्सच्या धुक्यामध्ये वाचकांना डुंबवून तेथील पाण्याला गंगेची उपमा देत लेखिकेने देशप्रेम जागवले आहे.
प्रवासवृत्ताचे स्वरूप काहीसे बदलत ललित रूप धारण करत लेखिका काहीशी आत्मचरित्राशी जवळीक या प्रवासवर्णनात साधताना दिसते. नवलेखकांना हे प्रवासवर्णन प्रोत्साहनपूरक ठरेल असे मत व्यक्त करावेसे वाटते.
रम्य ती भ्रमंती (प्रवासवर्णन)
लेखिका ः मृदुला मसूरकर
प्रकाशक ः शर्वा प्रकाशन
पृष्ठे ः 175
किंमत ः रु. 300/-