Published on
:
24 Nov 2024, 12:07 am
Updated on
:
24 Nov 2024, 12:07 am
पंढरपूर : पंढरपूर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे भाजपचे उमेदवार समाधान आवताडे व प्रशांत परिचारक यांच्या एकीमुळे भाजपचा विजय सोपा झाला आहे. यातच महाविकास आघाडीच्या काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत या महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांमध्ये मतविभागणी झाली. त्याचा फटकादेखील महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बसल्याचे दिसून येते. पंढरपूर शहर व 22 गावांतून महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांना मताधिक्य मिळाले, तर मंंगळवेढा शहर व ग्रामीण भागातून समाधान आवताडे यांना मताधिक्य मिळत गेले, ते शेवटपर्यंत कायम राहिले. नऊ हजारांहून अधिक मताधिक्याने आ. समाधान आवताडे विजयी झाले आहेत.
पंढरपूर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मात्र येथे 2021 च्या पोटनिवडणुकीत भाजपे समाधान आवताडे विजयी झाले. आ. आवताडे यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर पुन्हा त्यांना 2024 ला भाजपकडून उमेदवारी मिळाली. यावेळेस भाजपकडून प्रशांत परिचारक इच्छुक होते. मात्र भाजपने त्यांना शांत करुन आवताडे यांना उमेदवारी दिली. परिचारक यांनी पूर्ण ताकदीने आवताडे यांचा प्रचार केला. परिचारक यांचे कार्यकर्ते आवताडे यांना मतदान करणार का, असे चित्र तयार झाले होते. मात्र पंढरपूर शहरातून परिचारक यांनी आवताडे यांना लीड मिळवून दिला. मात्र 22 गावांत पहिल्या फेरीत आवताडे यांना 374 मतांचा लीड मिळाला. मात्र दुसरी फेरी ते 14 व्या फेरीपर्यंत काँग्रेसचे भगीरथ भालके आघाडीवर होते. परंतु पंढरपूर तालुक्यातील मतमोजणी पूर्ण होऊन मंगळवेढा तालुक्यातील मतमोजणी 15 व्या फेरीपासून सुरु झाली. यामध्ये भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी लीड घेतला. ते शेवटपर्यंत कायम राखण्यात यश्स्वी झाले.
पोटनिवडणुकीत समाधान आवताडे आणि प्रशांत परिचारक हे एकत्र होते. त्यामुळे त्या निवडणुकीत समाधान आवताडे यांचा 3700 मतांनी विजय झाला होता. आताही समाधान आवताडे व प्रशांत परिचारक हे एकत्रित असल्याने आवताडे यांचा विजय सोपा झाला आहे. मात्र महाविकास आघाडीत बिघाडी झाली. महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांच्या मतांमध्ये विभागाणी झाली. त्याचा फायदा आ. समाधान आवताडे यांना झाल्याचे दिसून येत आहे.
आ. समाधान आवताडे यांनी गेल्या तीन वर्षांत मंगळवेढा उपसा सिंचन योजना, पंढरपूर एमआयडीसी आदींसह तीन हजार कोटींचा विकास निधी व ‘लाडकी बहीण’ योजना याही जमेच्या बाजू ठरल्या आहेत. या निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा फारसा परिणाम झाल्याचे दिसून आले नाही.