निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ काळबांडे यांच्याकडून प्रमाणपत्र स्वीकारताना शिवाजी पाटील. यावेळी अन्य अधिकारीASHPAK
Published on
:
24 Nov 2024, 2:30 am
Updated on
:
24 Nov 2024, 2:30 am
गडहिंग्लज ः अत्यंत चुरशीने व अटीतटीने झालेल्या चंदगड विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर व अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांनी 24 हजार 134 इतक्या मतांनी दणदणीत विजय मिळविला. चंदगड विधानसभा मतदारसंघात पाच तुल्यबळ उमेदवार रिंगणात होते. या ठिकाणाहून कोण निवडून येणार, याबाबत कोणालाही अंदाज सांगता येत नव्हता. त्यामुळे अनेकजण चंदगड विधानसभा मतदारसंघ लकी ड्रॉ ठरणार, असे म्हणत होते; मात्र याला शिवाजी पाटील यांनी छेद दिला असून, त्यांनी सर्वच मतदान केंद्रांवर आघाडी कायम ठेवत दणदणीत विजय मिळविला.
या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार राजेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून डॉ. नंदा बाभूळकर, जनसुराज्य शक्ती पक्षाकडून मानसिंग खोराटे, अपक्ष अप्पी पाटील, बहुजन समाज पार्टीकडून श्रीकांत कांबळे, वंचित बहुजन आघाडीकडून अर्जुन दुंडगेकर, संभाजी बि—गेडकडून परशराम कुट्रे यांच्यासह अशोक आर्दाळकर, अक्षय डवरी, जावेद अंकली, तुळशीदास जोशी, समीर नदाफ, प्रकाश रेडेकर, मोहन पाटील, रमेश कुट्रे, संतोष चौगुले हे निवडणूक रिंगणात होते.
ही लढत शिवाजी पाटील, राजेश पाटील व डॉ. नंदा बाभूळकर या प्रमुख तिघांतच झाल्याचे दिसून आलेे. मतदानापूर्वी गडहिंग्लज तालुक्यामध्ये राजेश पाटील विरुद्ध नंदा बाभूळकर व चंदगडमध्ये राजेश पाटील विरुद्ध शिवाजी पाटील अशी लढत होईल, असे संकेत होते; मात्र याला शिवाजी पाटील यांनी छेद देत दोन्ही तालुक्यांमधून चांगले मताधिक्य घेतले. पाचही उमेदवारांनी प्रचाराचे टोक गाठले होते. बाभूळकर व राजेश पाटील यांनी मोठ्या सभा घेऊन मैदान गाजविले होते. शिवाजी पाटील यांनी मोठ्या सभा टाळून छोट्या सभांमधून आपली भूमिका मतदारराजासमोर मांडली होती.
दौलत सहकारी साखर कारखाना, वाढती बेरोजगारी, विकासकामे, भ—ष्टाचार, गुंडगिरी या मुद्द्यांभोवतीच ही निवडणूक रंगली होती. एकमेकांवर मोठे आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. शिवाजी पाटील यांनी मात्र या आरोपांना उत्तर देण्याऐवजी शांत राहणे पसंत करत मतदारांच्या गाठीभेटींवर भर दिला. यातूनच त्यांना मतदारांनी चांगला कौल दिल्याचे दिसून येते. चंदगडचा निकाल पाच ते सात हजारांच्या फरकात लागेल, असा अनेकांचा कयास होता; मात्र तब्बल चौपट आकडा वाढवित हा निकाल 24 हजारांच्या मताधिक्याला जाऊन पोहोचला.
गडहिंग्लज नगरपरिषदेच्या पॅव्हेलियन हॉलमध्ये सकाळी आठ वाजता टपाली मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली. सैनिकी मतदार, गृह मतदान, निवडणूक कर्मचारी, पोलिस, होमगार्ड आदींचे टपाली मतदान एकत्रित करण्यात आले. सैनिकांच्या मतपत्रिकांचे स्कॅनिंग सुरू करण्यात आले. दरम्यान, सकाळी 8.30 वाजता प्रत्यक्ष ईव्हीएम मतमोजणीला प्रारंभ झाला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार ऋषीकेश शेळके व राजेश चव्हाण यांनी काम पाहिले. सकाळी आठला सुरू झालेली मतमोजणी सायंकाळी सहा वाजता संपली. जवळपास दहा तास मतमोजणीची प्रक्रिया सुरू होती.
पहिल्यांदा आजरा तालुक्यातील कोळिंद्रे जि. प. मतदार संघातील मतमोजणी सुरू झाल्यावर राजेश पाटील, डॉ. बाभूळकर, अप्पी पाटील यांच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणाहून मताधिक्य मिळेल, अशी आशा वाटत होती; मात्र पहिल्या फेरीपासूनच शिवाजी पाटील यांनी आघाडी घेतल्याने इतर उमेदवारांच्या कार्यकर्त्यांत नैराश्य पसरले, तर शिवाजी पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला. त्यापाठोपाठ मतमोजणी गडहिंग्लज तालुक्यात आली. या ठिकाणी शिवाजी पाटील यांचे मताधिक्य घटेल, असा कयास राजेश पाटील, बाभूळकर व अप्पी पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा होता; मात्र येथेही शिवाजी पाटील यांची सरशी होत चालल्याने निकालाची दिशा स्पष्ट झाली. पहिल्या बारा फेर्यांनंतर शिवाजी पाटील हे 7 हजार मताधिक्याने पुढे गेल्याने त्यांचा विजय निश्चित मानला गेला. गडहिंग्लज तालुक्याची मोजणी संपल्यावर चंदगडमध्ये शिवाजी पाटील वाढीव मताधिक्य घेणार हे गृहीत धरून अन्य उमेदवारांच्या समर्थकांनी घरचा रस्ता धरला, तर शिवाजी पाटील यांचे काही कार्यकर्ते जल्लोषासाठी निघून गेले.
चंदगड मतदारसंघात एकूण 74.98 टक्के मतदान झाले होते. यामध्ये 2 लाख 46 हजार 695 मतांपैकी 1 लाख 21 हजार 774 इतके पुरुष (74.49 टक्के), तर 1 लाख 23 हजार 918 महिला (75.47 टक्के) व इतर तीन (33.33 टक्के) इतक्या मतदारांनी हक्क बजावला होता. यापैकी तब्बल 83 हजार 653 मते शिवाजी पाटील यांनी मिळविली. राजेश पाटील यांना 59 हजार 475, नंदा बाभूळकर यांना 46 हजार 487, अप्पी पाटील यांना 24 हजार 410, मानसिंग खोराटे यांना 22 हजार 20 इतकी मते मिळाली. नोटाला एकूण 968 मतदारांनी पसंती दिली.
टपाली मतदानात बाभूळकरांची बाजी
‘चंदगड’साठी एकूण 2 हजार 410 इतके टपाली मतदान होते. यापैकी 41 मते अवैध ठरली. 2 हजार 358 वैध मतांमध्ये डॉ. बाभूळकर यांना सर्वाधिक 772, राजेश पाटील यांना 645, शिवाजी पाटील यांना 601, अप्पी पाटील यांना 172 इतर मानसिंग खोराटे यांना 77 मते मिळाली. यामध्येही अकरा जणांनी नोटाचा पर्याय स्वीकारल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पाचपैकी चार व्हीव्हीपॅट गडहिंग्लज तालुक्यातील
मतदार संघाची व्हीव्हीपॅट मशिनची मोजणी करताना 390 पैकी लकी ड्रॉद्वारे 5 मतदान केंद्रे निवडण्यात आली. यामध्ये हिटणी, डोणेवाडी, निलजी, हेब्बाळ-जलद्याळ या चार गडहिंग्लजमधील, तर चंदगड तालुक्यातील हलकर्णी मतदान केंद्रातील मते मोजण्यात आली.
केवळ एक मत विरोधी उमेदवाराला
चंदगडमधून विजयी झालेले उमेदवार शिवाजी पाटील यांना त्यांचे मूळ गाव इनाम सावर्डेमध्ये 428 पैकी 427 मते मिळाली. फक्त एक मत दुसर्या उमेदवाराला गेले. दरम्यान, आमदार शिवाजी पाटील यांना राजेश पाटील यांनी मतमोजणी केंद्रावर पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. राजेश पाटील यांनी केलेल्या कृतीचे सर्वत्र कौतुक झाले.