Pune Elections 2024: पुणे जिल्ह्यात महायुतीची मविआला धोबीपछाड

2 hours ago 1

पुणे जिल्ह्यात महायुतीची मविआला धोबीपछाडPudhari

पुढारी वृत्तसेवा

Published on

24 Nov 2024, 2:34 am

Updated on

24 Nov 2024, 2:34 am

Pune Elections: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे आलेल्या त्सुनामी लाटेत महाविकास आघाडी जिल्ह्यात अक्षरश: वाहून गेली. जिल्ह्यात 21 पैकी तब्बल 18 जागा महायुतीने पटकाविल्या, तर केवळ दोनच जागा मविआला राखता आल्या. तर, एक जागा अपक्षाला गेली आहे.

जिल्ह्यावर गेली साठ वर्षे शरद पवारांचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे यंदाही शरद पवार यांचा करिष्मा चमत्कार करेल, असे मत राजकीय चाणक्य व्यक्त करत होते. कारण, शरद पवार यांनी या निवडणुकीला माझी अखेरची निवडणूक असल्याचे जाहीर करत गद्दारांना पाडा, असे आवाहन केले. मात्र, महायुतीच्या लाडकी बहीण योजनेसह सरकार आपल्या दारी, वर्षाला तीन गॅस सिलिंडर या योजनांचा ग्रामीण भागावर मोठा प्रभाव पडला आणि तो ऐतिहासिक ठरला.

जिल्ह्यातील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि रमेश बागवे यांच्यासह माजी आमदार रवींद्र धंगेकर, दिलीप मोहिते, अशोक पवार, संजय जगताप, संग्राम थोपटे, चंद्रकांत मोकाटे अशा मातब्बर राजकारण्यांना या निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. तर, महाविकास आघाडीतील वडगाव शेरीचे उमेदवार माजी आमदार बापू पठारे, खेड-आळंदी मतदारसंघातील शिवसेनेचे (उबाठा) बाबाजी काळे यांनी लक्षवेधी विजय मिळविले. जुन्नर मतदारसंघात अपक्ष उमेदवार शरद सोनवणे यांनी विजय मिळवत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

शहरातील पर्वती मतदारसंघात माधुरी मिसाळ सलग चौथ्यांदा, तर खडकवासल्यात भीमराव तापकीर सलग तिसर्‍यांदा विजयी झाले. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे या भाजपच्या उमेदवारांनी आपल्या जागा राखल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) चेतन तुपे यांनीही आपली जागा राखण्यात यश मिळविले आहे. तर पिंपरीतील अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार), भोसरीतील महेश लांडगे (भाजप) यांनीही आपापल्या जागा राखल्या आहेत.

बारामतीतून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आंबेगावमधून सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) यांनी सलग आठव्यांदा विजयी होत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. इंदापूरमधून दत्तात्रय भरणे, मावळमधून सुनील शेळके, दौंडमध्ये राहुल कुल हेही पुन्हा विजयी झाले आहेत.

जुन्नरमध्ये अपक्षाची बाजी

जुन्नर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार शरद सोनवणे (73 हजार 355 मते) यांनी धक्कादायक विजय मिळविला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) सत्यशील शेरकर (66 हजार 664 मते) यांचा 6 हजार 691 मतांची आघाडी घेत धक्कादायक पराभव केला.

दिलीप वळसे पाटील यांचा निसटता विजय

आंबेगाव मतदारसंघात माजी मंत्री दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, 1 लाख 6 हजार 888 मते) यांना देवदत्त निकम (1 लाख 5 हजार 365 मते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार) यांनी कडवी झुंज दिली. वळसे यांनी अवघ्या 1 हजार 523 मतांचे मताधिक्य घेत निकम यांचा पराभव केला.

खेड- आळंदीवर फडकला शिवसेनेचा भगवा

खेड-आळंदी मतदारसंघात शिवसेनेचा (उबाठा) भगवा फडकला आहे. शिवसेनेचेबाबाजी काळे (1 लाख 50 हजार 152 मते) यांनी आमदार दिलीप मोहिते (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, 98 हजार 409 मते) यांचा तब्बल 51 हजार 743 मतांची आघाडी घेत दारुण पराभव केला आहे.

राहुल कुल यांनी गड राखला

दौंड मतदारसंघात राहुल कुल (भाजप, 1 लाख 20 हजार 721 मते) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार रमेशआप्पा थोरात (1 लाख 6 हजार 832 मते) यांच्यावर 13 हजार 889 मतांनी मात करत विजय मिळविला.

लक्षवेधी लढतीत भरणेमामांची सरशी

हर्षवर्धन पाटील यांनी अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश करीत निवडणूक रिंगणात उडी घेतल्याने इंदापूरचे आमदार दत्तामामा भरणे (1 लाख 16 हजार 857 मते) व हर्षवर्धन पाटील (97 हजार 701 मते) यांच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. इंदापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे दत्तामामा भरणे यांनी तब्बल 19 हजार 156 मतांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला.

शिरूर अजित पवारांच्या पाठीशी

शिरूर मतदारसंघाने या वेळी अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत ज्ञानेश्वर कटके (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, 1 लाख 92 हजार 281 मते) यांना विजयी केले आहे. कटके यांनी 74 हजार 550 मतांचे अधिक्य मिळवत माजी आमदार अशोक पवार (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, 1 लाख 17 हजार 731 मते) यांना पराभवाची धूळ चारली आहे.

पुतण्यावर काकाची मात

हाय व्होल्टेज लढत म्हणून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती मतदारसंघात काकाने पुतण्यावर दणदणीत मात करीत बारामतीकर आपल्याच मागे असल्याचे दाखवून दिले आहे. अजित पवार (1 लाख 81 हजार 132 मते, राष्ट्रवादी काँग्रेस) यांनी आपला पुतण्या युगेंद्र पवार (80 हजार 233, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार) यांचा 1 लाख 899 मतांनी पराभव केला.

पुरंदरमध्ये विजय शिवतारे

पुरंदर मतदारसंघात शिवसेनेचे (शिंदे गट) विजय शिवतारे (1 लाख 25 हजार 819 मते) यांनी काँग्रेसचे आमदार संजय जगताप (1 लाख 1 हजार 631 मते) यांना पराभवाची धूळ चारली आहे. चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत शिवतारे यांनी 24 हजार 188 मतांच्या फरकाने जगताप यांच्यावर मात केली.

संग्राम थोपटे यांना धक्का

भोर मतदारसंघात आमदार संग्राम थोपटे (1 लाख 6 हजार 817 मते) यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) शंकर मांडेकर यांनी 1 लाख 26 हजार 455 मते घेत थोपटे यांच्यावर 19 हजार 638 मतांनी दणदणीत विजय मिळविला आहे.

शेळकेंनी गड राखला

बंडखोरी करीत बापू भेगडे (अपक्ष) यांनी उभे केलेले आव्हान एक लाखाहून अधिक फरकाने मोडून काढत सुनीलअण्णा शेळके यांनी (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) मावळचा गड राखला आहे. शेळके यांनी 1 लाख 91 हजार 255 मते मिळवत भेगडे (82 हजार 960 मते) यांना 1 लाख 8 हजार 295 मतांनी पराभवाची धूळ चारली आहे.

चिंचवडवर भाजपचेच वर्चस्व

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप (भाजप) यांनी तब्बल 1 लाख 3 हजार 774 मतांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार राहुल कलाटे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार) यांचा पराभव केला. जगताप यांना 2 लाख 35 हजार 232 मते मिळाली, तर कलाटे यांना 1 लाख 31 हजार 458 मतांवर समाधान मानावे लागले.

पिंपरीवर बनसोडे यांचेच वर्चस्व

पिंपरी मतदारसंघातील निवडणूक अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) यांनी 36 हजार 664 चे मताधिक्य घेत जिंकली. बनसोडे यांना 1 लाख 9 हजार 239 मते मिळाली, तर सुलक्षणा धर (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार) यांना 72 हजार 575 मते मिळाली.

भोसरीत पुन्हा लांडगेच

भोसरी मतदारसंघात भाजपचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी अजित गव्हाणे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार) यांचा 63 हजार 765 च्या मताधिक्याने पराभव केला. लांडगे यांच्या पारड्यात भोसरीकरांनी 2 लाख 13 हजार 624 मते टाकली, तर गव्हाणे यांना 1 लाख 49 हजार 859 मते पडली.

पठारे यांचा निसटता विजय

अजित पवार यांच्या पाठबळावर निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या आमदार सुनील टिंगरे यांना बापू पठारे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार) यांनी पराभवाची धूळ चारली आहे. पठारे यांनी टिंगरे यांच्यावर अवघ्या 4 हजार 710 मतांनी निसटता विजय मिळविला. पठारे यांना 1 लाख 33 हजार 689, तर टिंगरे यांना 1 लाख 28 हजार 979 मते मिळाली.

सिद्धार्थ शिरोळे विजयी

शिवाजीनगर मतदारसंघात पुन्हा एकदा आमदार सिद्धार्थ शिरोळे (भाजप) विजयी झाले आहेत. शिरोळे यांना 84 हजार 695 मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी दत्ता बहिरट (काँग्रेस) यांना 47 हजार 993 मते मिळाली. 36 हजार 702 मतांच्या फरकाने शिरोळे विजयी झाले.

चंद्रकांतदादांना लाखाहून अधिक मताधिक्य

भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विजयावर कोथरूडकरांनी पुन्हा शिक्कामोर्तब केले आहे. शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे (शिवसेना उबाठा) यांचे आव्हान त्यांनी लीलया मोडून काढत त्यांच्यावर 1 लाख 12 हजार 41 च्या मताधिक्याने मात केली आहे. पाटील यांना 1 लाख 59 हजार 234 मते मिळाली, तर मोकाटे यांना 47 हजार 193 मतांवर समाधान मानावे लागले.

चुरशीच्या लढतीत तापकीर यांची सरशी

खडकवासला मतदारसंघात चुरशीच्या लढतीत भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांनी सचिन दोडके (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार) यांच्यावर 52 हजार 322 मतांची दणदणीत आघाडी घेत विजय मिळवत विजयाची हॅटि्ट्रक साधली आहे. तापकीर यांना 1 लाख 63 हजार 131 मते मिळाली, तर दोडके यांना 1 लाख 10 हजार 809 मते मिळाली. मनसेचे मयूरेश वांजळे यांना मात्र 42 हजार 897 मतांवर समाधान मानावे लागले.

माधुरी मिसाळ यांचा चौथ्यांदा विजय

भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी 54 हजार 660 इतक्या लक्षणीय मताधिक्याने पर्वती मतदारसंघात चौथ्यांदा विजय मिळविला आहे. मिसाळ यांना 1 लाख 18 हजार 193 मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी अश्विनी कदम (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार) यांना 63 हजार 533 मते मिळाली. काँग्रेसचे माजी उपमहापौर आबा बागूल यांनीही बंडखोरी करत अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली होती. तथापि, त्यांना 10 हजार 476 इतक्याच मतांवर समाधान मानावे लागले.

हडपसरचा ट्रेंड तुपे यांनी बदलला

हडपसर मतदारसंघातील मतदार प्रत्येक वेळी नव्या प्रतिनिधीला संधी देतात, असे गेल्या काही निवडणुकांतून स्पष्ट झाले होते. तथापि, आमदार चेतन तुपे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) यांनी 7 हजार 274 मताधिक्य मिळवत हा ट्रेंड मोडीत काढला. तुपे यांना 1 लाख 34 हजार 545 मते मिळाली, तर प्रशांत जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार) यांना 1 लाख 27 हजार 271 मते मिळाली. मनसेचे साईनाथ बाबर यांनीही 32 हजार 751, तर शिवसेनेचे (उबाठा) बंडखोर उमेदवार गंगाधर बधे यांनीही 6 हजार 575 मते मिळवली.

चुरशीच्या लढतीत कांबळे विजयी

माजी मंत्री रमेश बागवे (काँग्रेस) यांच्यामुळे चुरशीच्या ठरलेल्या पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील लढतीत भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी 10 हजार 320 मतांच्या फरकाने विजय प्राप्त केला. कांबळे यांना 76 हजार 32 मते मिळाली, तर बागवे यांना 65 हजार 712 मतांवर समाधान मानावे लागले.

धंगेकर यांना पराभवाचा धक्का

लक्षवेधी ठरलेल्या कसबा मतदारसंघातील निवडणुकीत आमदार रवींद्र धंगेकर (काँग्रेस) यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. गेल्या वर्षी या मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांच्यावर मात केली होती. तथापि, आता भाजपचे हेमंत रासने यांनी 19 हजार 413 च्या फरकाने धंगेकर यांना पराभूत केले आहे. रासने यांना 89 हजार 752 मते मिळाली, तर धंगेकर यांना 70 हजार 433 मतांवर समाधान मानावे लागले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article