जत : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या जत विधानसभा मतदार संघातील चुरशीच्या लढतीत भाजपचे उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर यांनी विजय मिळवला. त्यांनी 1 लाख 13 हजार 737 मते घेऊन प्रतिस्पर्धी काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत यांचा तब्बल 38 हजार 240 मतांनी पराभव केला.
शनिवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. पडळकर यांनी पहिल्याच फेरीत 828 मताधिक्य घेतले. ही आघाडी 23 व्या फेरीअखेर कायम ठेवत विजया गवसणी घातली. नवव्या फेरीअखेर पडळकर यांनी 18 हजार 246 मतांनी आघाडी घेताच भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष केला. सायंकाळी साडेचार वाजता अंतिम निकाल हाती येताच जत शहरातून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.
पडळकर आघाडीवर असल्याची आकडेवारी समोर येताच तालुक्यात जल्लोष सुरू झाला. हजारोंच्या संख्येने भाजप-महायुतीचे समर्थक रस्त्यावर आले. गावोगावी विजयाच्या घोषणा, रॅली, ढोल-ताशांचा गजर करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शहरात गोपीचंद पडळकर, ब्रह्मानंद पडळकर, डॉ. रवींद्र आरळी, संजय तेली, आप्पासाहेब नामद, सरदार पाटील, चंद्रशेखर गोब्बी, सुनील पवार, संजय कांबळे, परशूराम मोरे, महादेव हिंगमिरे, आप्पा पवार, लक्ष्मण जखगोंड, अंकुश हुवाळे, सुभाष गोब्बी, वृषाल पाटील, जत तालुका फर्टीलायझर्स असोसिएशनचे सचिव अर्जुन सवदे, आकाराम मासाळ, टीमू एडके यांच्यासह प्रमुखांची मिरवणूक काढण्यात आली.
मतमोजणीस सकाळी आठ वाजता प्रारंभ झाला. टपाली मतांची मोजणी सुरू झाल्यानंतर ईव्हीएम मोजणीस सुरुवात झाली. पहिल्या फेरीतच पडळकर यांनी 828 मतांची आघाडी घेतली. दुसर्या फेरीत 625 मतांची, तिसर्या फेरीत 1586 मतांची, चौथ्या फेरीत 749 मतांची, पाचव्या फेरीत 596 मतांची आघाडी घेत त्यांनी मोठ्या विजयाकडे वाटचाल सुरू केली. कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. त्यानंतर सहाव्या फेरीत त्यांनी थेट 2466 मतांची आघाडी घेतली. सातव्या फेरीतही ते 1089 मतांनी पुढे राहिले. आठव्या फेरीत पुन्हा पडळकर यांनी 3150 मतांची आघाडी घेतली. नवव्या फेरीत 5657 मतांनी पुढे जात तब्बल 18,246 मतांनी आगेकुच करत विजयावर शिक्कामोर्तब केले. दहाव्या फेरीत विक्रमसिंह सावंत आघाडीवर होते, मात्र पडळकर यांचे मताधिक्य कायम राहीले.
अकराव्या फेरीत 854 मतांची आघाडी घेत पुन्हा पडळकरांचा झंझावात सुरू झाला. बाराव्या फेरीअखेर ते 19 हजार 597 मतांनी, तेराव्या फेरीअखेर 24 हजार 422 मतांनी आघाडीवर राहिले. पंधराव्या फेरीअखेर 28 हजार 351 मतांची आघाडी झाली. सतराव्या फेरीअखेर 30 हजार 827 मतांची आघाडी घेत ते 35 हजारांकडे सरकले. 18व्या फेरीत 33 हजार 178 आणि 19 व्या फेरीत 35 हजार 328 उच्चांकी मतांच्या आघाडीवर पोहचले. विसाव्या फेरीत 37 हजार 103 मतांची आघाडी घेतली. शेवटच्या फेरीअखेर गोपीचंद पडळकर हे 38 हजार 240 मतांनी विजयी झाले. पाचव्या फेरीनंतर आ. पडळकर यांच्या विजयाची आघाडी कायम असल्याचे लक्षात येताच, जत तालुक्यात मोठ्या जल्लोषाला सुरुवात झाली. मतदान केंद्राच्या बाहेर तब्बल 25 जेसीबीच्या सहाय्याने गुलालाची उधळण करण्यात आली. दहा हजारांवर कार्यकर्ते या उत्सवात सहभागी झाले होते. तसेच तालुक्यातील उमदी, संख, बनाळी, कोसारी, रेवनाळ, बिळूर, मुचंडी, तिकोंडी, माडग्याळ, कुंभारी, बाज, प्रतापपूर, येळवी, सनमडी आदी गावात मोठा जल्लोष करण्यात आला. पडळकर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली.
विक्रम सावंत 75 हजार, तर रवी-पाटील 19 हजारांवर
या निवडणुकीत काँग्रेसचे विक्रमसिंह सावंत व भाजप बंडखोर तम्मनगौडा रवी-पाटील हे भूमिपूत्राच्या मुद्यावर लढत होते. परंतु मतदारांनी त्यांना झिडकारले. सावंत यांना 75 हजार 497 मते मिळाली. तर रवी-पाटील यांना 19 हजार 426 इतकी मते मिळाली.
एकूण मतांपैकी पन्नास टक्के मते पडळकरांना
एकूण मतांच्या 50 टक्के मते आ. गोपीचंद पडळकर यांना मिळाली. त्यांना एक लाख 13 हजार 737 मते मिळाली. टपाली मतदानातही त्यांनी 20 मतांची आघाडी घेतली. त्यांना 914 पोस्टल मतदान झाले.