साहित्य जगत – ओळखीचा चेहरा

2 hours ago 1

>> रविप्रकाश कुलकर्णी

चित्रपटात आपले लक्ष असते ते पडद्यावर चमकणाऱया नायक- नायिका यांच्याकडे. मग त्या अनुषंगाने आजूबाजूच्या लोकांकडे वा तपशिलाकडे लक्ष गेले तर गेले, पण त्या आजूबाजूच्या माणसांमुळेच, (ज्यांना एक्स्ट्रा नावापासून सहकलाकारापर्यंत अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते) तो प्रसंग उठावदार झालेला असतो. बऱ्याचदा त्यांना आपण चेहऱयाने ओळखतो, पण त्यांचे नाव आपल्याला ठाऊक असतेच असे नाही.

एका पुस्तकाच्या मुखपृष्ठावर बोलका फोटो पाहून वाटले, “अरे, यांना आपण कुठल्या तरी सिनेमात पाहिलं आहे.’’ साहजिकच पुस्तक घेतले. पुस्तकाचे नाव ‘शांततारका’ शब्दांकन रजनी हिरळीकर. प्रकाशक रावा प्रकाशन, कोल्हापूर. पुस्तकाला प्रस्तावना आहे अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने यांची. त्यात त्या म्हणतात, “शांता तांबेंनी आधी अनेक चित्रपटांमध्ये छोटय़ा-मोठय़ा भूमिका केल्या. भूमिका प्रमुख नसल्या तरी त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला. बदलत्या काळाप्रमाणे त्या बदलल्या. अनेक मालिकांमध्येही त्या वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसू लागल्या. काळाबरोबर त्यांनी स्वतला मोल्ड केले. त्यांचा आवाज ठसकेबाज, उंची छान. साहजिकच नऊवारी साडी त्यांना खुलून दिसायची. नऊवारी साडी नेसून त्यांनी भूमिकेसाठी आवश्यक दागिने अंगावर चढवले की, त्या दागिन्यांचे तेज त्यांच्या चेहऱयावरही चढायचे. अतिशय घरंदाज दिसायच्या त्या. असा पेहराव आणि कपाळावर मोठे कुंकू किंवा चंद्रकोर असे त्यांचे रूप आजही माझ्या डोळ्यांसमोर आहे. खरं सांगू, त्यांना कुणी गॉडफादर असता किंवा त्यांना अचूक मार्ग सापडला असता तर त्या नक्कीच सुलोचनादीदी, जयश्रीताई, सीमा देव यांच्या रांगेत जाऊन बसल्या असत्या. इतक्या त्या ताकदीच्या कलाकार होत्या!’’

अर्थातच ही प्रशस्ती वाचल्यानंतर शांता तांबे यांच्याबद्दल, त्यांच्या चित्रपटाबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. शांताबाईंच्या पंचाहत्तरीनिमित्त 2010 मध्ये ‘केसरी’मधून त्यांचे आत्मकथन क्रमश आले, ते आता पुस्तक रूपाने आलेले आहे.

बार्शीच्या टोळ खाणावळवाल्यांची शांता ही मुलगी. या खाणावळीत नाटक मंडळींची ऊठबस होती. टोळांनी आपले कुटुंब त्यापासून चार हात दूरच ठेवले होते. मात्र शांताने मामाशीच प्रेमविवाह केला आणि बार्शी गाव सुटून फरफट सुरू झाली. कोल्हापुरात असाच एक नाटकवाला भेटला. त्याने देशबंधू संगीत नाटक कंपनीत नवख्या शांताला काम दिले आणि तेव्हापासून त्यांच्या तोंडाला जो रंग लागला तो लागलाच. आधी नाटक आणि नंतर चित्रपट यात त्या गुंतून गेल्या. मात्र हे त्यांनी केवळ गरजेपोटी स्वीकारले. त्यासंदर्भात त्या म्हणतात, “आमच्या काळात प्रतिष्ठित घराण्यातील मुली नाटक, चित्रपटात येत नसत. गरजेपोटी रंगमंचावर येणारी माझ्यासारखी एखादीच.’’

बाळ गजबर यांच्या ‘नवरा बायको’ या चित्रपटात किरकोळ दिसल्या. त्यानंतर तब्बल दहा वर्षांनी म्हणजे 1961 मध्ये अनंत माने यांच्या ‘मानिनी’मध्ये त्यांना प्रेक्षकांच्या लक्षात यावी एवढी भूमिका मिळाली. नंतर सहकलाकार म्हणून नाटक, चित्रपटांत कामे मिळू लागली. ठसकेबाज भूमिका ही त्यांची खासीयत झाली. ‘सवाल माझा ऐका’मधल्या चांभारणीच्या भूमिकेबद्दल तर त्यांना महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.

त्यानंतर ‘आंधळा मारतो डोळा’, ‘अनोळखी’ ते थेट ‘सुगंधी कट्टा’, ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’, ‘भैरू पैलवान की जय’, ‘लक्ष्मी’… असे चित्रपट येतच गेले, पण त्यामागे दृष्टिकोन एकच, आपल्या कुटुंबाला सावरणे. यात सगळे आयुष्य गेले. त्याबाबत त्या तटस्थपणे म्हणतात, “चित्रपट-नाटकात काम करणारी नटी या दृष्टीने त्या जुन्या काळात आमच्याकडे पाहणारा समाज. मध्यमवर्गीय संस्कृतीतही कला कमीपणाची. हळूहळू सवय झाली त्याची. पुढे काळ बदलला, मानसन्मान मिळू लागला. शेजारी, नातलग, आप्तेष्ट यांच्याकडून थोडेफार कौतुक होऊ लागलं. असे उन्हाळे, पावसाळे सारख्याच ताकदीने झेलले.’’

या सगळ्या अनुभवाची गोळाबेरीज त्यांना समाधान देणारीच आहे. त्यांनी एक प्रसंग सांगितलाय की, सुरुवातीला घरभाडे देण्याइतकेदेखील पैसे नव्हते. तेव्हा त्यांनी स्वतच्या टोपपदरी इरकली, लुगडे घरमालकाकडे देत म्हटले, “सध्या ठेवा तुमच्या जवळ. पैसे मिळतील तेव्हा आणून देईन आणि लुगडं घेऊन जाईन.’’ पुढे ते पैसे त्यांनी फेडले. स्वतचे छोटे घरकुल उभारले आणि म्हणूनच त्या निष्कर्ष काढतात, “दिवस पालटतात. प्रयत्न आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर माणूस जीवनात यशस्वी होतो याचा मी स्वतच अनुभव घेतलाय.’’

असे भाग्य किती जणांच्या वाटय़ाला येते? सिनेमात हयात घालवलेल्यांच्या भाळी तर नाहीच नाही. म्हणून या कहाणीचे महत्त्व.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article