Published on
:
24 Nov 2024, 12:03 am
Updated on
:
24 Nov 2024, 12:03 am
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाने भगवी शाल पांघरली आहे. हिंदुत्वाच्या भगव्या लाटेने या पुरोगामी जिल्ह्यातील काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला आहे. याचे मोठे परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर होणार आहेत. विशेषतः आगामी काळात होणार्या महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समित्या त्याचप्रमाणे जिल्ह्याचा बलाढ्य आर्थिक गड असलेल्या गोकुळच्या राजकारणावर याचे परिणाम होणार आहेत. गोकुळवर लगेच परिणाम होतील, असे नाही; पण जिल्ह्यात महायुती बलाढ्य झाली आहे. काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे शिवसेनेला आता जिल्ह्यात अस्तित्वासाठी झगडावे लागणार आहे. गोकुळ व केडीसी बँकेत काँग्रेससह अन्य पक्ष सत्तेत आहेत. तेवढीच त्यांची आता सत्ता राहिली आहे.
कोल्हापूर एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. काँग्रेसमधील फुटीनंतरही राष्ट्रवादी काँग्रेस या काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या समुहाला कोल्हापूरने साथ दिली. कोल्हापूर जिल्हा म्हणजे युतीसाठी दुष्काळी भाग अशी टीका कधीकाळी उद्धव ठाकरे यांनी केली होती; मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्याने दहा पैकी सहा आमदार शिवसेनेचे निवडून दिले; मात्र एवढे यश दिल्यानंतरही शिवसेनेने जिल्ह्याला एक मंत्रिपदही दिले नाही, याचा जाब कोण विचारायचा? अखेर पुन्हा एकदा वारे फिरले आणि 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेचे पाच आमदार पराभूत झाले. केवळ एका जागेवर शिवसेनेला यश मिळाले; मात्र तेही शिंदे शिवसेनेत गेल्यामुळे महायुतीला बळ मिळाले.
जिल्ह्यात काँग्रेसचे चार आमदार होते. अजित पवार राष्ट्रवादीचे 2 ,जनसुराज्य शक्ती एक ( सहयोगी सदस्य भाजप), अपक्ष दोन (एक शिंदे शिवसेना समर्थक व एक भाजप समर्थक), शिंदे शिवसेना एक असे पक्षीय बलाबल होते. जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसने मोठा भाऊ म्हणून पाच जागा घेतल्या; मात्र एकाही जागेवर काँग्रेसला यश मिळाले नाही. कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसने राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्याविरोधात काँग्रेसमध्येच बंडाची भाषा सुरू होताच एका रात्रीत जाहीर केलेला उमेदवार बदलून मधुरिमाराजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यावेळी काँग्रेस नेत्यांमध्ये काय चर्चा झाली, याचा तपशील तेच सांगू शकतात; पण उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या क्षणी मधुरिमाराजे यांनी आपले सासरे खासदार शाहू महाराज व पती माजी आमदार मालोजीराजे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज मागे घेतला. त्यामुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील संतप्त झाले. ‘दम नव्हता तर उभा राहायचं नव्हतं ना मग’ अशा शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
पुन्हा एकदा ऐनवेळी धावाधाव करून काँग्रेसने राजेश लाटकर याना पुरस्कृत केले; मात्र त्यांना काँग्रेसचे चिन्ह न मिळाल्यामुळे ‘हात’ हे चिन्ह कोल्हापूर उत्तरमधून मतदानयंत्रावरून गायब झाले. ऐनवेळी लाटकर यांना पुरस्कृत करावे लागल्यामुळे सतेज पाटील यांना प्रचंड धावाधाव करावी लागली. त्याचा परिणाम कोल्हापूर दक्षिणमध्ये झाला. या निवडणुकीतील चुरस पाहता तेथे सतेज पाटील यांना लक्ष केंद्रित करता आले नाही. करवीरलाही त्याचा फटका जाणवला. कारण, हे दोन्ही मतदारसंघ हे कोल्हापूर उत्तर मतदारसंघाशी कनेक्टेड असल्याने त्याचा परिणाम तेथेही जाणवला. काँग्रेसकडून जे उत्तरमधून इच्छुक होते तेही लाटकर यांना पुरस्कृत केल्यामुळे नाराज झाले. सतेज पाटील यांची एकाकी झुंज अपायशी ठरली व काँग्रेसला कोल्हापूर उत्तरसह दक्षिणमध्येही पराभवाचा फटका बसला. कोल्हापूर उत्तरला शिंदे शिवसेनेचे राजेश क्षीरसागर, तर दक्षिणला भाजपचे अमल महाडिक विजयी झाले आहेत.
कोल्हापूर महापालिकेतील सत्तेत शिवसेना सहभागी होती, तर अमल महाडिक यांचे वडील महादेवराव महाडिक यांनी कोल्हापूर महापालिकेतील सत्ता दीर्घकाळ आपल्या हाती ठेवली होती. त्याला छेद देत सतेज पाटील, हसन मुश्रीफ व विनय कोरे यांनी महाडिक यांच्या सत्तेला सुरूंग लावला. आता महायुतीचे नेते असलेले राजेश क्षीरसागर, अमल महाडिक, हसन मुश्रीफ व विनय कोरे हे महायुतीचे घटक आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीत महायुतीचे नेते ताकदीने उतरणार यात शंका नाही. काँग्रेसचे विधानसभेतील अस्तित्व या पाच वर्षांसाठी थांबले आहे. शरद पवार राष्ट्रवादी व उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांचे जिल्ह्यात विधानसभेत अस्तित्व नाही. त्याचा परिणाम होणार आहे. महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांना खूप झगडावे लागणार आहे. इचलकरंजीला महापालिका स्थापन करण्यात आली असून तेथे पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेले हे शहर आता भाजपकडे आहे. दोन वेळा भाजपचे तर एकवेळा अपक्ष पण भाजप समर्थक आमदार येथे राहिले आहेत. आता भाजपचे राहुल आवाडे तेथे विजयी झाले आहेत. लगतच्या हातकणंगले मतदारसंघातून महायुतीचा घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे अशोकराव माने विजयी झाले आहेत. त्याचाही परिणाम येथे होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 10 पैकी 9 मतदारसंघांत महायुतीचे आमदार निवडून आले आहेत. त्याचा परिणाम जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका व नगरपंचायतींवर होणार आहे. महायुतीला वाटते तेवढी वाटचाल सोपी नाही. महाविकास आघाडीची वाट तर खडतरच आहे. या सार्या राजकीय गदारोळात गोकुळ व के. डी. सी. बँकेच्या राजकारणावरही परिणाम होणार आहे.
सतेज पाटील यांनी जिल्हा काँग्रेसची सूत्रे हाती घेतल्यानंतर शून्यावर असलेल्या काँग्रेसला चार जागांवर यश मिळून दिले. आता या निवडणुकीत विधानसभेत जिल्ह्यातील काँग्रेस पुन्हा शून्यावर आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे यांची शिवसेना यांनाही आपले खाते उघडता आले नाही.