>> जगदीश काबरे
हे जग पुरुषांचे आहे या चालीवर म्हणता येईल की, हे जग आस्तिकांचे आहे. ज्याप्रमाणे पुरुषसत्ताक व्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते, त्याचप्रमाणे या आस्तिकांच्या जगातसुद्धा नास्तिकांना दुय्यम स्थान दिले जाते.
नास्तिक विचाराची माणसे या जगात नेहमीच अल्पसंख्याक राहिलेली आहेत आणि त्यांच्यावर बहुसंख्य आस्तिकांचा दबावही राहिलेला आहे. त्यामुळे बरीच नास्तिक माणसे आपली नास्तिकता उघड करण्यात धजावत नाहीत. देव आणि धर्माला नाकारत नास्तिकतेचा विचार उच्चारवाने समाजात पसरवण्याचा प्रयत्न करणाऱया चार्वाकांना आस्तिकांनी जिवंत जाळून मारले. मध्ययुगात अशा प्रकारे त्यांनी ब्रुनोला जिवंत जाळले, तर गॅलिलीओला मरेपर्यंत कैदेत ठेवले. वर्तमान काळात तर त्यांनी अंनिसचे नेमस्त विचारसरणीचे नरेंद्र दाभोळकर, प्राध्यापक कलबुर्गी, पुरोगामी विचारसरणीचे गोविंद पानसरे आणि गौरी लंकेश यांचे तर सरळ सरळ खूनच केले. पण प्रश्न विचारण्याचे धाडस ज्या लोकांमध्ये होते आणि आहे त्यांच्यामुळेच मोठय़ा प्रमाणात वैज्ञानिक प्रगती व सामाजिक उन्नती झालेली दिसते. अशा माणसांनी जगभर वेगवेगळ्या संघटना उभारल्या आणि आस्तिकांशी दोन हात करायला सुरुवात केली.
असेच एक संघटन नास्तिक विचाराच्या विखुरलेल्या लोकांना बळ मिळावे म्हणून महाराष्ट्रात 2013 साली ‘ब्राइट्स सोसायटी’ नावाने नास्तिकतेचा जाहीर पुरस्कार करत जन्मास आले. या संघटनेने 11 वर्षांत बरीच मोठी मजल मारलेली आहे आणि महाराष्ट्रातील समस्त नास्तिकांना वैचारिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या संघटनेत मोठ्या प्रमाणात तरुणांची संख्या आहे हे विशेष.
या तरुणांमध्ये नवीन विचार स्वीकारण्याची आणि ते अमलात आणण्याची ताकद कशी वाढत गेली तसेच त्यांचा नास्तिकतेकडे कसा प्रवास झाला, ते मनोगत व्यक्त करणारे ‘ब्राइट्स सोसायटी’ने ‘तर्कटपंजरी’ हे पुस्तक प्राजक्ता अतुल यांच्या संपादनाखाली तयार केले आहे. या पुस्तकातील मनोगते वाचताना ही तरुण मंडळी समाजाच्या प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचे धाडस अंगी कशी आणि का आणू शकली याचे त्यांनी मनोज्ञ विवेचन केले आहे. यातील एकही व्यक्ती लेखक म्हणून प्रस्थापित नाही, पण त्यांच्या लिहिण्याच्या शैलीवरून हे लक्षात येते की, विचार जर स्पष्ट असतील तर आपण योग्य शब्दांत चपखलपणे ते मांडू शकतो. एकंदरीत संपूर्ण पुस्तक वाचल्यावर नास्तिकतेकडे प्रवास करणाऱया तरुणांना वैचारिक बळ तर मिळेलच, पण परिघावरील तळ्यात-मळ्यात विचार असलेल्या तरुणांचाही हे पुस्तक वाचून नास्तिकतेकडे प्रवास सुरू होईल, हे नक्की. भविष्यातील नास्तिक आणि विवेकी समाज घडवण्यासाठी या पुस्तकाचा मोठाच हातभार लागणार आहे.
‘तर्कटपंजरी’ हे पुस्तक तर्कटी नसून तर्काच्या आधार विवेकवादी कसे व्हावे हे समजावून सांगणारे पुस्तक आहे. भविष्यातील विवेकी समाजाचा भाग होऊ इच्छिणाऱ्या तरुणाईने ‘तर्कटपंजरी’ हे पुस्तक जरूर वाचावे आणि आपले विचार प्रगल्भ करावेत.
संपादक ः प्राजक्ता अतुल
प्रकाशक ः मधुश्री पब्लिकेशन, पुणे
पाने ः 165
मूल्य ः 150 रुपये