अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक पूर्व मतदारसंघातून भाजपचे अॅड. राहुल ढिकले यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे गणेश गिते यांना धूळ चारत दुसर्यांदा विधानसभा गाठली.Pudhari News network
Published on
:
24 Nov 2024, 8:55 am
Updated on
:
24 Nov 2024, 8:55 am
नाशिक : अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक पूर्व मतदारसंघातून भाजपचे अॅड. राहुल ढिकले यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे गणेश गिते यांना धूळ चारत दुसर्यांदा विधानसभा गाठली. ढिकले यांनी 87 हजार 187 मतांनी गितेंवर मात केली असून, ढिकलेंच्या विजयाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत एकच जल्लोष साजरा केला.
शरद पवार पक्षाचे गणेश गितेंना चारली धूळ
‘पूर्व’त 11 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा ठरली गेमचेंजर
1,941 मतदारांची ’नोटा’ला पसंती
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतदारांचा भाजपला कौल
मिळालेली मते
अॅड. राहुल ढिकले - 1,56,246
गणेश गिते - 68,429
रविंद्रकुमार पगार - 5,191
प्रसाद सानप - 4,987
एप्रिल-मे महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला साथ देणार्या पूर्व मतदारसंघाने विधानसभेतही युतीच्या बाजूने कौल दिला आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा लढतीत सर्वसामान्य जनतेने सुसंस्कृत व उच्चशिक्षित ढिकले यांनाच पुन्हा एकदा घसघशीत मतांनी विजयी केले आहे. पंचवटीमधील मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलात सकाळी 8 पासून मतमोजणीला प्रारंभ झाला. यावेळी पोस्टल मतांपासूनच ढिकले यांनी गिते यांच्यावर आघाडी घेतली. शेवटच्या 24 व्या फेरीपर्यंत ती कायम राखली. अॅड. ढिकले यांना एक लाख 54 हजार 671 मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी गणेश गिते यांना केवळ 67 हजार 136 मते मिळाली.
विधानसभा निवडणुकीत उमेदवारी घोषित करण्यापासून ते प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत पूर्व मतदारसंघाची निवडणूक गाजली. रिंगणात तब्बल 13 उमेदवार नशीब आजमावत असले तरी खरी लढत ही भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्येच पाहायला मिळाली. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये वारेमाप पैशांचा वापर झाल्याचा आरोपदेखील करण्यात आले. यावेळी दोन्ही प्रतिस्पर्ध्यांचे समर्थक एकमेकांना भिडल्याने निवडणुकीत टश्शन निर्माण झाली. परंतु, सरतेशेवटी जनतेने धनशक्तीला दूर सारत मागील पाच वर्षांतील विकासाला साथ देत ढिकले यांच्याच गळ्यात विजयाची माळ घातली.
मतमोजणी केंद्राबाहेर दोन्ही पक्षांचे समर्थक व कार्यकर्ते सकाळपासूनच ठाण मांडून होते. पण, प्रत्येक फेरीनिहाय राहुल ढिकले यांची आघाडी वाढत गेल्याने शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला. तर भाजप-महायुती समर्थकांनी ढोल-ताशांच्या ठेक्यावर ताल धरताना गुलालाची उधळण करत विजयोत्सव साजरा केला. दुपारी 2.30 ला आ. ढिकले यांचे मतमोजणी केंद्रावर आगमन झाले. यावेळी ढिकले समर्थकांचा उत्साह बघता गितेंचे प्रतिनिधी केंद्रामधून माघारी फिरले.
प्रतिस्पर्धी उमेदवार हा केवळ पैशाने श्रीमंत होता. पण, जनतेच्या दरबारात त्याची श्रीमंती चालली नाही. विकासामुळे महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे.
अॅड. राहुल ढिकले, आमदार
राज्यातील एकूणच चित्र बघता धक्कादायक निकाल लागले आहेत. जनतेने दिलेल्या प्रेमाबद्दल आभारी आहे. भविष्यातही जनसेवेचा आपला वसा कायम असेल.
गणेश गिते, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष