Published on
:
17 Nov 2024, 10:04 am
Updated on
:
17 Nov 2024, 10:04 am
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा; राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरणी (NCP Dispute) सुनावणी १९ नोव्हेंबरला होणार आहे. यापूर्वी १३ नोव्हेंबरला झालेल्या सुनावणीत अजित पवार गटाने (Ajit Pawar factions) शरद पवारांचा फोटो अजिबात वापरायचा नाही. तसेच घड्याळ चिन्ह वापरताना जो मजकूर न्यायालयाने लिहायला सांगितला आहे, तो प्रत्येक ठिकाणी लिहिला गेलाच पाहिजे, अशी ताकीद सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला दिली होती.
१९ नोव्हेंबरला होणाऱ्या सुनावणीत अजित पवार गटाला ‘आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत आहोत', असे सांगावे लागणार आहे आणि या संदर्भातील दाखलेही त्यांना द्यावे लागणार आहेत.
दरम्यान, मागील सुनावणीत शरद पवार (Sharad Pawar) गटाचे वकील सिंघवी यांनी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्याद्वारे करण्यात आलेली एक सोशल मीडियावरील पोस्ट न्यायालयाला दाखवली. या पोस्टमध्ये शरद पवारांचा फोटो वापरण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयाने याची पडताळणी करायला सांगितले होते.
अजित पवारांनी आता स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकले पाहिजे, असेही निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने याआधीच्या सुनावणीवेळी नोंदवले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरणी गेल्या बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी हे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
शरद पवारांचा फोटो अजिबात वापरायचा नाही
सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला सांगितले की, त्यांनी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना विविध माध्यमातून सूचना द्यावी की, कुठेही शरद पवारांचा फोटो अजिबात वापरायचा नाही. दरम्यान आम्ही मार्च महिन्यात काही सूचनानिर्देशित केल्या होत्या, त्याचे तंतोतंत पालन होणे अपेक्षित आहे. यावर अजित पवार गटाच्या वकिलांनी फोटो दाखवत आम्ही न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत आहोत, असे म्हटले तर सिंघवी यांनी त्याला विरोध करत अजित पवार गट पालन करत नसल्याचे म्हटले आणि त्यासाठी त्यांनीही काही फोटो दाखवले.