परभणी (Parbhani):- महापरिनिर्वाण दिनानिमित्त दक्षिण मध्य रेल्वेच्या (South Central Railway) वतीने नांदेड मार्गावरुन दादरकडे जाण्यासाठी विशेष रेल्वेचे नियोजन करण्यात आले आहे. अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
रेल्वेमध्ये एकूण १४ अनारक्षित डब्बे
ही विशेष रेल्वे ५ डिसेंबरला अदिलाबाद येथून दादरसाठी निघेल. सदरची रेल्वे किनवट, हिमायतनगर, भोकर, मुदखेड, नांदेड, पूर्णा, परभणी, मानवत रोड, सेलू, परतुर, जालना, छत्रपती संभाजी नगर, लासुर, रोटेगाव, नगरसोल, अंकाई, मनमाड, नाशिक, ईगतपुरी, कल्याण, दादर आदी स्थानकांवर थांबेल. परतीचा प्रवास ही रेल्वे ७ डिसेंबर रोजी दादर येथून करेल. या रेल्वेमध्ये एकूण १४ अनारक्षित डब्बे जोडलेले आहेत. महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेला मोठ्या प्रमाणात गर्दी होते. अनुयायी मोठ्या संख्येने मुंबई, दादरकडे जातात. रेल्वेंना होणारी गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने विशेष रेल्वे सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.