Published on
:
21 Nov 2024, 3:27 pm
Updated on
:
21 Nov 2024, 3:27 pm
परभणी : नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीपेक्षा विधानसभेच्या निवडणूकीत यावेळी महिला मतदारांचे मतदानाचे प्रमाण चारही मतदारसंघात मिळून 9 टक्क्यांनी वाढले आहे. महिलांबरोबरच पुरूषांच्या मतदानाची टक्केवारी सात टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे महिलांच वाढीव मतदान हे निर्णयक ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.
मे मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीत जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघात 14 लाख 96 हजार 296 मतदार होते. त्यात 7 लाख 76 हजार 381 पुरूष तर 7 लाख 19 हजार 884 महिला मतदारांचा समावेश होता. इतर 31 मतदार होते. त्यातील 5 लाख 10 हजार 616 पुरूषांनी तर 4 लाख 33 हजार 479 महिलांनी मतदान केले. एकूण 9 लाख 44 हजार 99 इतके मतदान या 4 मतदारसंघात झाले होते. त्यात पुरूष मतदारांचे प्रमाण 65.77 टक्के इतके होते. तर महिला मतदारांचे प्रमाण 60.22 टक्के इतके होते. त्यामुळे महिलांनी कमी प्रमाणात मतदान केल्याचे दिसून येते. एकूण टक्केवारी 63.10 टक्के इतकी होती. (Maharashtra assembly polls)
लोकसभेच्या तुलनेत विधानसभेसाठीच्या मतदानात मोठी वाढ
लोकसभेच्या या मतदानाच्या प्रमाणात बुधवारी झालेल्या विधानसभेसाठीच्या मतदानात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. प्रामुख्याने महिला मतदारांचा टक्के लोकसभेच्या तुलनेत तब्बल 9 टक्क्यांनी वाढला आहे. लोकसभेत 60.22 टक्के राहिलेले मतदान कालच्या प्रक्रियेत 69.85 टक्क्यांवर जावून पोचले आहे. पुरूषांच्या मतदानातही चांगलीच वाढ झाली आहे. लोकसभेत 65.77 टक्के राहिलेले मतदान या निवडणूकीत 72.96 टक्के म्हणजेच जवळपास 7 टक्क्यांनी वाढले आहे. जिंतुरमध्ये 3 लाख 88 हजार 2945 मतदारांपैकी 2 लाख 92 हजार 634 मतदारांनी हक्क बजावला. यात पुरूषांचे प्रमाण 77.11 तर महिलांचे प्रमाण 73.51 टक्के आहे. एकूण 75.36 टक्के मतदान जिंतूरमध्ये झाले.
परभणीत 3 लाख 50 हजार 559 मतदारांपैकी 2 लााख 30 हजार 424 मतदारांनी हक्क बजावला. यात पुरूषांचे प्रमाण 37.21 तर महिलांचे 64.19 टक्के मतदान झाले. एकूण 65.73 टक्के मतदान झाले असून जिल्ह्यातील चार मतदारसंघात हेच प्रमाण सर्वात कमी राहिले आहे. गंगाखेडमध्ये 4 लाख 21 हजार 272 मतदारांपैकी 3 लाख 7 हजार 683 मतदारांनी हक्क बजावला. यात पुरूषांचे प्रमाण 74.31 टक्केत तर महिलांचे प्रमाण 71.37 टक्के झाले आहे. एकूण मतदान 73.4 टक्के इतके झाले आहे. पाथरीत 3 लाख 93 हजार 244 मतदारांपैकी 2 लाख 79 हजार 104 मतदारांनी हक्क बजावला. यात पुरूषांचे प्रमाण 72.47 तर महिलांचे प्रमाण 69.39 टक्के झाले आहे. एकूण 70.97 टक्के मतदानाची नोंद पाथरीत झाली आहे.(Maharashtra assembly polls)
1 लाख 65 हजारांनी मतदानात वाढ
लोकसभा निवडणूकीत 4 मतदारसंघातील 14 लाख 96 हजार 296 मतदारांपैकी 9 लाख 44 हजार 99 मतदारांनी मतदान केले होते. ही टक्केवारी 63.10 टक्के इतकी होती. यावेळीच्या विधानसभा निवडणूकीत मतदारांमध्ये वाढ झाली आहे. 15 लाख 53 हजार 369 मतदारांपैकी 11 लाख 9 हजार 845 मतदारांनी मतदान केले. लोकसभेच्या तुलनेत या मतदानात 1 लाख 65 हजार 746ची वाढ झाली आहे. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीतही वाढ होवून लोकसभेत असलेली 63.10 टक्केवारी 71.45वर जावून पोचली आहे. साधारणतः 72 टक्क्यांवर ही अंतीम आकडेवारी राहिल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यानूसार टक्केवारीतील वाढ ही 8 टक्क्यांची झाली आहे.