परभणी (Parbhani):- जिल्ह्यातील शेती पिकांच्या सिंचनासाठी वरदान ठरलेल्या जायकवाडी प्रकल्पाच्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले आहे. कालव्याची दुरावस्था झाल्याने शेवटच्या शेतकर्यापर्यंत पाणी पोहोचेल, याची शक्यता कमी आहे.
परभणी जिल्ह्यासाठी पाणी सोडण्याचे नियोजन
निसर्गनियमाने आपली वाट काढणार्या पाण्याला कालव्यातूनच अडथळ्यांची शर्यत पार करण्याची वेळ आली आहे.
यावर्षी झालेल्या मुबलक पावसामुळे (Raining) सर्वच जल प्रकल्प तुडूंब भरले आहेत. मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने शेती सिंचनासाठी या पाण्याचा उपयोग होणार आहे. विभागस्तरावर झालेल्या बैठकीत जायकवाडी आणि निम्न दूधना प्रकल्पातून परभणी जिल्ह्यासाठी पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जायकवाडी प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी व उन्हाळी पिकासाठी पाणी पाळ्या सोडण्यात येणार आहेत. निम्न दूधना प्रकल्पातून रब्बी व उन्हाळी हंगामाकरीता प्रत्येकी तीन पाणी अवर्तन प्रस्तावित करण्यात आले आहेत. या पाण्याचा वापर शेती (Farm)सिंचनासाठी शेतकर्यांना होईल.
या कालव्याची झाली आहे दुरावस्था
जायकवाडी प्रकल्पामधून पाणी सोडण्यात आले आहे. परभणी शहराजवळून जाणार्या जायकवाडीच्या मुख्य कालव्याला पाणी देखील आले आहे. मात्र या कालव्याची दुरावस्था झाली आहे. पाण्याचा प्रवाहाला अडथळा येत आहे. कालव्यातील गाळ काढलेला नाही. त्याच बरोबर ठिकठिकाणी कालव्यामध्ये झाडे उगवली आहेत. कालव्याद्वारे सोडण्यात आलेल्या पाण्याचा पुरेपुर वापर होण्याची शक्यता कमी आहे. या पाण्याचा शेतकर्यांना लाभ मिळावा यासाठी मुख्य कालव्यांवर लहान चार्या बनवून शेतीपर्यंत पाणी पोहचविण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात या चार्यांद्वारे अपेक्षित क्षमतेने पाणी वाहत नसल्याचे दिसत आहे. जागोजागी चार्या फुटल्याने अधिक अपव्यय होत आहे. जायकवाडी कालव्याला (Canals) पाणी सोडण्यापूर्वी मुख्य कालवा, चार्यांची दुरुस्ती करणे अपेक्षित होते. मात्र तसे झालेले नाही.