जनतेने काँग्रेसचा खरा चेहरा ओळखावा; हिमाचलचे माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांची टीकाPudhari
Published on
:
15 Nov 2024, 3:02 am
Updated on
:
15 Nov 2024, 3:02 am
Pune News: हिमाचल प्रदेशात काँग्रेसने जनतेला आश्वासने देऊन सत्ता आणली. मात्र, सत्तेवर आल्यानंतर त्यांना मागील दोन वर्षांत कोणत्याही आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे हिमाचल प्रदेशातील जनतेत आक्रोश निर्माण झाला आहे. ही परिस्थिती महाराष्ट्रमध्ये येऊ नये, अशी आमची इच्छा आहे. महाराष्ट्रातील जनतेने काँग्रेसचा खरा चेहरा ओळखावा, अशी टीका हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते जयराम ठाकूर यांनी केली.
भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र मीडिया सेंटरमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ठाकूर बोलत होते. या वेळी कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री डॉ. अश्वत्थ नारायण, कर्नाटकचे माजी मंत्री नारायण गौडा, भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि तेलंगणा राज्यातील खासदार डी. के. अरुणा उपस्थित होते.
ठाकूर म्हणाले, हिमाचल प्रदेशला देवभूमी म्हणतात. काँग्रेस नेत्यांनी प्रत्येक महिलेस दर महिना 1500 रुपये देण्याची घोषणा केली. यासोबतच पाच लाख युवकांना रोजगार दिला जाईल, एक लाख सरकारी पदे भरली जातील, प्रत्येक महिन्याला 300 युनिट वीज मोफत देऊ, अशी आश्वासने दिली. मात्र, सत्ता आल्यानंतर आश्वासनांची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे हिमाचल प्रदेशातील जनतेत आक्रोश निर्माण झाला आहे. ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये येऊ नये, अशी आमची इच्छा आहे. जनतेने काँग्रेसचा खरा चेहरा ओळखावा.
कर्नाटकचीही आर्थिक स्थिती बिघडवली
काँग्रेसने वेगवेगळी आश्वासने देऊन कर्नाटकमध्ये सत्ता आणली. मागील 18 महिन्यांपासून कर्नाटकात काँग्रेस सरकार आहे. या कालावधीत राज्याची आर्थिक स्थिती बिघडवली असून, अनेक भ्रष्टाचार, घोटाळे होताना दिसत आहेत. तेलंगणाच्या निवडणुकीसाठी कर्नाटक सरकारने 87 कोटी रुपये बेकायदेशीर हस्तांतरित केले. महाराष्ट्रामधील निवडणुकीसाठी कर्नाटक सरकारचे पैसे वापरले जात आहेत. राज्यात विकास ठप्प झाला असून, काँग्रेस सरकारमधील आमदारदेखील अस्वस्थ झाले आहेत, अशी टीका कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री डॉ. अश्वत्थ नारायण यांनी केली.
तेलंगणात महालक्ष्मी योजनेला काँग्रेसकडून हरताळ
तेलंगणामध्ये काँग्रेसने निवडणुकीवेळी सहा गॅरंटी जनतेस दिल्या. शेतकर्यांना दोन लाख रुपये कर्जमाफी घोषणा केली, शेतकरी आणि कामगार यांना आर्थिक सहाय्य करू असे सांगितले. महिलांना दर महिना 2500 रुपये देऊ, अशी महालक्ष्मी योजना सांगितली, प्रत्येक महाविद्यालयनी तरुणीस इलेक्ट्रिक दुचाकी देऊ म्हणाले, बेरोजगार भत्ता देऊ अशी आश्वासने दिली. पण, सत्तेवर आल्यानंतर कोणत्याही आश्वासनाची पूर्तता केली नाही. तरीही मुख्यमंत्री देशात दुसर्या राज्यात जाऊन आश्वासने पूर्ण केल्याचा खोटा प्रचार करत आहेत, अशी टीका खासदार डी. के. अरुणा यांनी केली.