विधानसभा निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुटीPudhari
Published on
:
15 Nov 2024, 1:47 am
Updated on
:
15 Nov 2024, 1:47 am
Pune News: महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांना 18 ते 20 नोव्हेंबर रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवाव्यात, असे निर्देश राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी संबंधितांना द्यावेत, अशा सूचना राज्याचे उपसचिव तुषार महाजन यांनी दिले आहेत.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचार्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे अनेक शाळांचे शिक्षक व मुख्याध्यापक निवडणूक कामात व्यस्त राहणार आहेत.
या पार्श्वभूमीवर शाळांना सुटी जाहीर करण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्त कार्यालयातर्फे शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यावर राज्याचे उपसचिव तुषार महाजन यांनी परिपत्रकाद्वारे सुटी जाहीर केली आहे.
तुषार महाजन यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 राज्यात सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल, त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घ्यावा, अशा सूचना राज्याचे शिक्षण आयुक्त यांनी संबंधितांना द्यावेत. परिणामी राज्यातील शाळांना आता 18 ते 20 नोव्हेंबर दरम्यान सुटी राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.