Published on
:
27 Nov 2024, 7:54 am
Updated on
:
27 Nov 2024, 7:54 am
जन्माचे गाव नाही, घराचा पत्ता नाही, आधार नाही, रहिवाशी नाही, शिक्षणाचा गंध नसलेल्या डोंबारी समाजाची व्यथाच वेगळी असल्याने या समाजात लहानग्यांना दोरी वेगवेगळी प्रात्यक्षिक करावयास लावत त्यातून मिळणार्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो. या समाजातील कुटुंबाच्या व्यथा अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणार्या ठरत आहेत. तर या समाजाची अजूनपर्यंत कोणतीही प्रगती झाली नसली, तरी शासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे त्यांच्या डोंबारी खेळातून पहावयास मिळत आहे. एकीकडे केंद्र व राज्य सरकार शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करत असताना वास्तव वेगळेच असून पाच ते दहा वर्षाच्या कोवळ्या जिवांना जीवघेण्या कसरती करायला लाऊन त्यातून मिळणार्या पैशांवर उदरनिर्वाह करतानाचे खोपोली शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात दिसून आले. डोंबारी समाज विविध कसरती करून पोटाच्या खळगीसाठी जीव टांगतीला टाकल्याचे भयानक वास्तव पाहण्यास मिळाले.
शिक्षण, विकास आणि आधुनिकतेचा स्पर्श न झालेला हा डोंबारी समाज रस्त्याच्या कडेला तसेच बाजार पेठमध्ये पारंपरिक डोंबारी कला सादर करत नाच व खेळ याचा सुरेख संगम साधत टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी लोकांसमोर कला सादर करून मिळालेल्या पैशातून उदरनिर्वाह करीत आहेत. तर उद्याची चिंता न करता घाम गाळून कला दाखवत लोकांचे मनोरंजन करून त्यांच्याकडून मिळालेल्या पैशातून भाकरीचा चंद्र त्यांच्या ताटात दिसतो. तेव्हा त्यांच्या चेहर्यावर समाधान दिसून येते.
कलेला नागरिकांकडून दाद मिळे ना...
दुर्मिळ झालेला डोंबारी खेळ पाहण्याकडे कोणाला वेळ नसल्याने डोंबारी समाजाचा उपजीविकेचा हा व्यवसाय अडचणीत आला आहे. पूर्वी गावोगावी डोंबारी समाज आपल्या कसरतीचे खेळ करत. या खेळातून त्यांना गाव खेड्यात चांगले पैसे मिळत होते. या पैशावर डोंबारी समाजाच्या कुटुंबाची उपजीविका चांगली चालत होती. परंतु, काळाच्या ओघात माणूस गतिमान झाल्याने कोणाकडेही डोंबार्याचा खेळ पाहण्यासाठी वेळ नाही.