Published on
:
27 Nov 2024, 10:03 am
Updated on
:
27 Nov 2024, 10:03 am
छत्रपती संभाजीनगर : एका कंपनी व्यवस्थापकाला सायबर भामट्यानी मुंबई पोलिसच्या नावाने व्हिडिओ कॉल करून दोन दिवस डिजिटल अरेस्ट केले. मनी लॉड्रिगच्या गुन्ह्यात अटकेची भीती दाखवून २७ लाख ६५ हजार रुपये उकळले. ही घटना ३० व ३१ ऑगस्टला श्रीकृष्णनगर, हडको भागात घडली. मंगळवारी (दि.२६) या प्रकरणी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शेखर राजकुमार वायकोस (रा. श्रीकृष्णनगर, एन-९, हडको) असे फसवणूक झालेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. वायकोस हे खासगी कंपनीत व्यवस्थापक आहेत. ३० ऑगस्टला सकाळी ११ वाजता त्यांना एक अन ओळखी फोन आला. त्याने मुंबई पोलिस भुवन कुमार नाव सांगून तुमच्याविरुद्ध लोकांना पैसे मागणे, धमक्या देणे, असा गुन्हा आहे. २६ ऑगस्टला गुन्हा रजिस्टर क्रमांक ००४२९ असा दाखल असून तुम्ही एका तासात हजर व्हा, असे सांगत धमकावले. त्यामुळे वायकोस घाबरले. त्यांनी छत्रपती संभाजीनगरला राहत असून एका तासात मुंबईत येणे शक्य नाही, असे सांगितले.
त्यानंतर हॉटलाईनवर पोलिस अधिकाऱ्यांशी बोलणे करून देतो, त्यांना सांगा असे सुनावले. त्याने विनयकुमार चौबे या पोलिस अधिकाऱ्याचे नाव घेत त्यांनी व्हिडिओ कॉल करायला सांगितले. असून स्काईप अॅप डाऊनलोड करायला लावले. त्यावर मुंबई पोलिस धारावी स्टेशन या खात्याशी कनेक्ट व्हायला लावले. त्यानंतर व्हिडिओ कॉल सुरू झाला. शेखर वायकोस हे व्हिडिओ कॉलवर बोलायला लागताच समोरच्या बनावट पोलिस अधिकाऱ्याने त्यांना आधार क्रमांक मागितला. तो देताच तुमच्यावर मनी लॉड्रिगचा मोठा गुन्हा असून नरेश गोयल नावाच्या इसमाला अटक केल्यावर त्याच्या घडझडतीत तुमच्या नावाचे एटीएम कार्ड सापडल्याची बतावणी केली.
तसेच गोयलने कबुली जबाबात तुमचे नाव घेतल्याचे सांगत तुमच्या नावाचे अटक वॉरंट असून त्याची कॉपी दाखवून अटकेची धमकी दिली. अखेर, पत्नीने असा काही प्रकार नसतो, असे म्हणत पतीला फसवणुकीचा एक व्हिडिओ दाखविल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. या प्रकरणाचा निरीक्षक सोमनाथ जाधव करीत आहेत.
बँकेत पाठवून रक्कम उकळली
सायबर भामट्यांनी वायकोस यांना बँकेत पाठवून दुपारी १ वाजता ६ लाख रुपये आरटीजीएसद्वारे मागविले. त्यानंतर ३१ ऑगस्टला पुन्हा व्हिडिओ कॉल आला. पुन्हा ६ लाख ३५ हजार रुपये दुसऱ्या एका खात्यावर आरटीजीएसद्वारे वायकोस यांनी पाठविले. त्यानंतर त्याच दिवशी पुन्हा अटकेची भीती दाखवून सायबर भामट्यांनी त्यांच्याकडून १५ लाख ३० हजार रुपये उकळले. दोन दिवस त्यांचे व्हिडिओ कॉल सुरूच होते.
व्हिडिओ कॉलवर चौकशी
वायकोस यांना व्हिडिओ चौकशी सुरू असल्याचे सांगत त्यांना एका वेगळ्या खोलीत बसायला लावले, तेथे कोणीही येता काम नये, असेही बजावले. त्यानंतर तुमच्या बैंक खात्यातून २ कोटींची उलाढाल झाली आहे. त्यामुळे सर्व बँक खात्यांची आणखी तपासणी करण्यासाठी सर्व पैसे एसबीआय बँकेच्या खात्यात एकत्र आणायला लावले. एवढ्या कमी वेळेत ते शक्य नाही, असे म्हणताच तू आमहाला कोऑपरेट कर, तुला निर्दोष बाहेर काढतो, असे सांगून विश्वासात घेतले.