Rail Budget 2025: देशात वंदे भारत ट्रेन आल्यानंतर तिची मागणी वाढली आहे. लग्झरी आणि सेमी हायस्पीड प्रकारात ही ट्रेन आहे. परंतु या ट्रेनचे तिकीट दर जास्त आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना तिचा प्रवास करता येत नाही. परंतु लवकरच देशातील सर्वसामान्य जनताही लक्झरी ट्रेनने प्रवास करणार आहे. रेल्वे मंत्रालय विशेष तसेच सामान्य गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी आधुनिक सुविधांनी सुसज्ज गाड्या चालवणार आहे. यामुळे सर्व वर्गातील लोक आरामात आणि सुरक्षितपणे प्रवास करू शकतील. रेल्वे मंत्रालयाने यासाठी ब्लू प्रिंट तयार केली आहे. त्याला अर्थसंकल्पात मंजुरी मिळाल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, सध्या सर्वात आलिशान ट्रेन ही वंदे भारत एक्सप्रेस आहे. त्यामुळेच या ट्रेनला देशात सर्वाधिक मागणी आहे. आता त्याचे स्लीपर व्हर्जनही लवकर सुरु होणार आहे. यामुळे लांबचा प्रवास करणारे लोकांना त्याचा फायदा होईल. या ट्रेनची संख्याही वाढवण्यात येत आहे.
अमृतभारत लग्झरी ट्रेनची चाचणी पूर्ण
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, सर्वसामान्यांसाठी वंदेभारतसारख्या सुविधा असलेल्या अमृतभारत ही ट्रेन आहे. या ट्रेनची एक वर्षापासून चाचणी सुरु होती. आता ती पूर्ण झाली आहे. या श्रेणीतील दोन गाड्या गेल्या वर्षी धावल्या होत्या. आता अमृतभारत ट्रेनची संख्या वाढवली जात आहे. तसेच नमो भारत ट्रेनची दोन प्रमुख शहरांदरम्यानची चाचणी यशस्वी झाली आहे. ही ट्रेन गुजरातमधील गुज ते अहमदाबाद दरम्यान चालवली जात आहे. या ट्रेनची संख्याही वाढवली जाणार आहे आहे. या ट्रेनमुळे मोठ्या शहरांमधून जवळच्या शहरांमध्ये जाणे सोपे होणार आहे.
350 लग्झरी ट्रेन तयार होणार
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, वंदे भारत स्लीपर-चेअर कार, अमृत भारत आणि नमो भारत 350 ट्रेनची निर्मिती सुरु आहे. त्याला अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे या ट्रेनची निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. या गाड्या मागील अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या गाड्यांपेक्षा वेगळ्या आहेत. अमृत भारतच्या 100 रेल्वे गाड्या, नमो भारतच्या 50 रेल्वे गाड्याआणि 200 वंदे भारत (स्लीपर आणि चेअरकार) यांचा समावेश आहे. या गाड्या दोन ते तीन वर्षांत तयार होतील.