Ratan Tata death : दुर्मिळ ‘रतन’ हरपले , रतन टाटांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पोस्ट

3 hours ago 1

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रतन टाटांना श्रद्धांजली वाहिली.

टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि जगातील मोठे उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या 86व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनाने केवळ उद्योगजगतावर नव्हे तर संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. प्रकृती खालावल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारांदरम्यान बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्या निधनानंतर देशभरातून मान्यवरांच्या प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शोक व्यक्त केला आहे. एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीत तेथेही त्यांच्या भावना मांडल्या.

दुर्मिळ रत्न हरपले , मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख

‘ नैतिकता आणि उद्यमशीलता यांचा अपूर्व आणि आदर्श संगम रतनजी टाटा यांच्या ठायी होता. सुमारे 150 वर्षांची श्रेष्ठत्व आणि सचोटीची परंपरा असलेल्या टाटा ग्रुपची जबाबदारी यशस्वीरित्या पेलणारे रतनजी टाटा हे एक जिवंत आख्यायिका होते. त्यांनी वेळोवेळी दाखविलेला निर्णायक खंबीरपणा आणि मानसिक कणखरपणी टाटा ग्रूपला वेगळ्या औद्योगिक उंचीवर घेऊन गेला. त्यांना मी आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. रतनजी टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील’, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं.

रतन टाटा यांची औद्योगिक झेप आकाशाला गवसणी घालणारी

‘ रतनजी टाटा हे भारताचा अभिमान होते, येत्या पिढीच्या उद्योजकांसाठी ते नेहमीच एक आदर्श राहतील. रतनजी टाटा यांनी अतिशय कौशल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अनेक कंपन्यांना टेकओव्हर करुन व्यवसाय वाढवला. माहिती तंत्रज्ञानाच्या नव्या क्षेत्रांतही त्यांनी दमदारपणे आघाडी घेतली. टाटा ग्रूपची विश्वासार्हता जपत त्यांनी टाटा ग्रूपचा विस्तार केला. आपल्या निर्णयक्षमतेने त्यांनी टाटा ग्रुपच्या कंपन्यांमध्ये सळाळते चैतन्य निर्माण केले. नैतिकता जपत उद्योगाबरोबरच देश आणि समाजाचा विकास करण्याची टाटांची विचारधारा आणि परंपरा त्यांनी समर्थपणे सांभाळली. रतनजी टाटा यांची औद्योगिक झेप आकाशाला गवसणी घालणारी होती. तरुणांमधील कर्तृत्वाला, प्रयोगशिलतेला प्रोत्साहन देण्यात ते कायम आघाडीवर होते’.

‘1991 मध्ये रतनजी टाटा टाटा समूहाचे अध्यक्ष झाले. त्यांच्या कार्यकाळात टाटा समूहाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. त्यांनी टेल्को (नंतर टाटा मोटर्स) ची कार निर्मिती क्षेत्रात आणि टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस (TCS) ची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीची कंपनी बनवली. तसेच, टाटा केमिकल्स, टाटा टी, टाटा स्टील यासारख्या अनेक कंपन्यांना त्यांनी यशस्वी केले. 2012 मध्ये ते टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झाले. मात्र, त्यानंतरही ते विविध उद्योगांना मार्गदर्शन करत होते’.

मुंबईवरील हल्ल्यानंतर त्यांनी दाखवलेला खंबीरपणा कायम स्मरणात राहील

‘2008 च्या मुंबई हल्ल्यांनंतर रतनजी टाटा यांनी दाखवलेला खंबीरपणा सगळ्यांच्या कायमच स्मरणात राहील. त्यांचे निर्णय, धाडसी वृत्ती आणि सामाजिक बांधिलकी यांचे स्मरण कायम राहणार आहे’,असे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केलं.

भारतीय उद्योजक जगताचा विश्वासार्ह, आश्वासक चेहरा हरपला

भारतीयांच्या मनात प्रेम, आदर, आपुलकीचं स्थान असलेल्या रतन टाटा यांचं निधन ही भारतीय उद्योगजगताची मोठी हानी आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली.

‘ उद्योगपती रतन टाटा हे भारतीय उद्योगक्षेत्राचा विश्वासार्ह,आश्वासक चेहरा होते. टाटा उद्योगसमुहाला आंतरराष्ट्रीय उंची, सन्मान, प्रतिष्ठा, विश्वासार्हता मिळवून देतांना देशाचा गौरव वाढवण्याचं काम त्यांनी केलं. सचोटी, प्रामाणिकपणाने उद्योग क्षेत्रात यश मिळवता येतं हे त्यांनी सप्रमाण सिद्ध करुन दाखवलं. संकटकाळात देशवासियांच्या मदतीला धावून येणारा, सामाजिक बांधिलकी जपणारा उद्योगसमुह म्हणून टाटा उद्योगसमुहाला देशभक्तीचं प्रतिक बनवण्यात ते यशस्वी ठरले. सर्वसामान्य भारतीयांचं कारचं स्वप्न त्यांनी ‘नॅनो’ कारच्या माध्यमातून पूर्ण केलं. टाटा उद्योगसमुहाचेD संस्थापक नुसेरवानजी, जमशेटजी टाटा यांचा उद्योग, व्यापार, सामाजिक कार्य, देशभक्तीचा वारसा त्यांनी यशस्वीपणे पुढे नेला. प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रेम, आदर, आपुलकीचं स्थान निर्माण करणाऱ्या रतन टाटा साहेबांचं निधन ही भारतीय उद्योगजगताची मोठी हानी आहे. टाटा परिवार आणि रतन टाटा साहेबांच्या चाहत्यांच्या दु:खात मी सहभागी असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. रतन टाटा साहेबांना सद्गती लाभो, अशी प्रार्थना करतो,’ असे अजित पवार यांनी नमूद केलं.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article