Published on
:
05 Feb 2025, 3:53 am
Updated on
:
05 Feb 2025, 3:53 am
नाशिक : मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीला दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही देवेंद्र फडणवीस मुंबईतील शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर राहायला गेले नसल्याच्या मुद्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. वर्षा बंगल्याच्या लॉन्समध्ये गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात बळी दिलेल्या रेड्यांची मंतररेली शिंगं आणून पुरली आहेत. दुसरा मुख्यमंत्री येईल, त्याचे मुख्यमंत्रिपद टिकू नये, यासाठी ही मंतरलेली रेड्याची शिंगं वर्षा बंगल्यावर पुरून ठेवण्यात आली आहेत. त्यामुळेच फडणवीस हे वर्षा बंगल्यावर राहायला जात नाहीत, असा खळबळजनक आरोप खा. राऊत यांनी केला आहे.
नाशिक दौऱ्यावर आलेल्या खा. राऊत यांनी मंगळवारी (दि. ४) माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, वर्षा बंगल्यात कोणीतरी जादूटोण्याचा प्रकार केल्याने मुख्यमंत्री फडणवीस पुन्हा या बंगल्यात राहायला तयार नाहीत. वर्षा बंगल्यावर राहायला गेलो तरी रात्री तिकडे झोपणार नाही, असे देवेंद्र फडणवीसांचे म्हणणे आहे, असा दावाही राऊत यांनी केला. मुख्यमंत्री फडणवीस अद्याप वर्षा बंगल्यावर राहायला का गेले नाहीत? त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन इतके दिवस झाले. मग ते मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाहीत? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान राज्याच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा विषय आहे. राज्यातील लिंबू सम्राटांनी याचे उत्तर द्यावे. शिंदे गटात असे अनेक लिंबूसम्राट असल्याचे राऊत म्हणाले. कामाख्या मंदिरातून आणलेली रेड्यांची शिंगे मंतरलेली असल्याचे भाजपच्या गोटात चर्चा असल्याचा दावा केला.
मंतरलेली शिंगे पुरल्याच्या चर्चेवर आमचा विश्वास नाही. आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा पळणारे लोक आहोत, असा दावाही राऊत यांनी यावेळी केला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान आहे. त्यांच्या प्रतिष्ठेचा तो मुद्दा आहे. नक्की तिथे काय घडलंय? कुणामुळे झालंय? मुख्यमंत्र्यांच्या मनात काय भीती आहे? ते का अस्वस्थ आहे? हे महाराष्ट्राला समजायला हवं', असेही राऊत म्हणाले.