दहावी-बारावीची परीक्षाpudhari
Published on
:
05 Feb 2025, 6:31 am
Updated on
:
05 Feb 2025, 6:31 am
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणार्या दहावी-बारावीच्या परीक्षेत यंदा 14 लाख 94 हजार बारावीचे विद्यार्थी, तर 16 लाख 7 हजार दहावीचे, असे एकूण 31 लाखांवर विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेसाठी तब्बल 1 लाख 80 हजारांहून अधिक मनुष्यबळ कार्यरत राहणार आहे. राज्य मंडळाकडून परीक्षांची आवश्यक सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून, परीक्षा सुरळीत पार पाडण्यावर राज्य मंडळाचा भर असल्याचे राज्य मंडळातील अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.
अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी राज्य मंडळाने यंदा जोरदार तयारी केली आहे. बारावीची परीक्षा 11 फेब—ुवारी ते 18 मार्च आणि दहावीची परीक्षा 21 फेब—ुवारी ते 17 मार्चदरम्यान घेण्यात येणार आहेत. त्यानुसार दोन्ही इयत्तांच्या विद्यार्थ्यांना हॉलतिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे. दहावी-बारावीच्या परीक्षेत दरवर्षी कॉपी केसेस, बोगस विद्यार्थी सापडणे, समूह कॉपी, पेपर व्हायरल होणे, असे प्रकार सर्रास घडताना दिसतात. यंदा मात्र राज्य मंडळ गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करणार आहे. त्यासाठी राज्यमंडळाकडून कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पडाव्यात, यासाठी महाराष्ट्र शासन व राज्य मंडळ प्रयत्नशील आहे. यासंदर्भात मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दूरचित्र प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. या दूरचित्र प्रणाली बैठकीमध्ये कॉपी प्रकरणास पूर्णत: प्रतिबंध करण्यासाठी राज्यभर कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संवेदनशील परीक्षा केंद्रांची ड्रोन कॅमेर्याद्वारे निगराणी.
परीक्षा सुरू होण्याअगोदर एक दिवस आधी परीक्षा केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा सुव्यवस्थित आहेत का? याची खात्री पटविणार.
परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडीओ चित्रीकरण करणार.
कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर भरारी
पथके व बैठी पथके राहणार.
परीक्षा केंद्रांवर नियुक्त केलेल्या केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित घटकांची फेशिअल सिस्टिमद्वारे तपासणी होणार.
परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणार्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार.
परीक्षा केंद्रांपासून 500 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात येणार.
परीक्षा केंद्रांच्या परिसरात 144 कलम लागू करण्यात येणार.