Published on
:
05 Feb 2025, 8:43 am
Updated on
:
05 Feb 2025, 8:43 am
शिरोली एमआयडीसी, पुढारी वृत्तसेवा : ऊस तोडणीसाठी उभा फड पेटवल्याने त्यामध्ये एका नवजात बिबट्या सदृश्य बछड्याचा होरपळून मृत्यू झाला. तर एका घोणस जातीच्या सापाचे डोळे आगीत गेले. ही घटना नागाव (ता. हातकणंगले) येथील हिंगणे मळ्यात घडली. या घटनेमुळे नागाव शेतीवाडी परिसरातील बिबट्याचे वास्तव अधोरेखित झाले असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटनास्थळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करत बछड्यास वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. उसाला आग लागताच बिबट्याने फडातून पळ काढल्याचे फडकऱ्याच्या एका लहान मुलाने पाहिल्याचे सांगितले जात आहे. वनरक्षकाकडून परिसरात पाहणी सुरू आहे.
नागाव येथील हिंगणे मळातील चिंतामणी सोळांकुरे यांच्या उसाच्या फडाला मंगळवारी ऊस तोड आल्याने फडकऱ्यांनी उभा ऊस चारी बाजूनी पेटवून दिल्याने यात पिलासह लपलेल्या बिबट्या दृश्य मादीने जाळाची धग लागताच पलायन केले. त्या परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्याच्या काही पाऊल खुणा आढळलेल्या नाहीत. त्यामुळे ड्रोन कॉमेराद्वारे पाहणी करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
होरपळून मृत्यू झालेल्या बिबट्या दृश्य बछड्याचा जन्म ७ ते ८ दिवसांपूर्वी झाला असल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या परिसरात अन्य बछडे व त्यांची आई सुरक्षित किंवा याच फडात त्यांचाही होरपळून मृत्यू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण शेतातील ऊस अजून तोडून पूर्ण झालेला नाही. या आगीत बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाला त्याच बरोबर एका घोणस जातीच्या विषारी सापालाही आपले डोळे गमवावे लागले आहेत.
यावेळी वनाधिकारी एम. एस. पोवार, अमोल चव्हाण, टोप वैद्यकीय अधिकारी आश्विनी कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.