दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. दिल्लीतील सर्व 70 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होत आहे. दिल्ली विधानसभेच निकाल 8 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे. दिल्ली पोलीस मतदारांना मतदानापासून रोखत असल्याचा आरोप सौरभ भारद्वाज यांनी केला आहे. तसेच पोलिंग बूथ एजंटला रिलिव्हर आल्यानंतरही बूथबाहेर सोजत नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर आपचे संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल संतप्त झाले आहेत. पोलिंग बूथ एजंटला तुम्ही बंदी का बनवत आहात? असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी खळबळजनक आरोप केला आहे. राघव चढ्ढा यांचे ट्विट शेअर करताना ते म्हणाले, ‘हे आता अती झाले. तुम्ही रिलीव्हरला आत कसे येऊ देऊ शकत नाही? जर आत असलेल्या बूथ एजंटला शौचालयात जावे लागले तर तुम्ही त्याला बंदी बनवून ठेवाल का? त्याच्या जागी एक रिलीव्हर जाईल. हे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. तुम्ही बूथ एजंटना बंदी कसे बनवू शकता? असा सवालही त्यांनी केला.
ये तो हद हो गई। रिलीवर को कैसे अंदर नहीं जाने दोगे? अंदर वाले बूथ एजेंट को अगर टॉयलेट जाना है तो क्या उसे बंदी बनाकर रखोगे? उसकी जगह रिलीवर तो जाएगा। ये तो human rights violation है। आप बूथ एजेंट्स को बंदी बनाकर कैसे रख सकते हो? @ECISVEEP https://t.co/2vtS35CtO5
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) February 5, 2025
आम आदमी पक्षाने काही जागांवर गैरव्यवस्थापन आणि अनियमिततेचा आरोप केला. आम आदमी पक्षाने नवी दिल्लीच्या जागेबाबत अनेक तक्रारी केल्या. या जागेवरून निवडणूक लढवणारे अरविंद केजरीवाल देखील रिलीव्हरला आत जाऊ न दिल्याच्या आरोपावर संतापले. ते म्हणाले की हे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे.
आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी आरोप केला की, नवी दिल्ली मतदारसंघातील जवळपास अर्ध्या बूथवरून त्यांना तक्रारी येत आहेत की मतदान एजंटांना बाहेर येऊ दिले जात नाही आणि मदत करणाऱ्यांना आत जाऊ दिले जात नाही. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यासाठी आलेल्या खासदाराने सांगितले की, ‘जर पोलिंग एजंटला बाहेर येऊ दिले नाही, तर किती मतदान झाले आहे, बनावट मतदान झाले आहे की नाही, ईव्हीएम योग्यरित्या काम करत आहे की नाही यासारख्या तपशीलांची अधिकृतपणे माहिती देता येणार नाही.’ मी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे की रिलीव्हरला आत जाण्याची परवानगी द्यावी. राघव चढ्ढा यांनी असाही आरोप केला की त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिस ठाण्यात ताब्यात घेण्यात आले आहे. निष्पक्ष निवडणुकांमध्ये असा हस्तक्षेप होता कामा नये. पोलीस कोणत्याही मतदाराला ओलीस ठेवू शकत नाहीत,असेही ते म्हणाले.