Published on
:
05 Feb 2025, 12:49 pm
Updated on
:
05 Feb 2025, 12:49 pm
विटा : विट्यातील एमडी ड्रग कारखाना प्रकरणात पाटील वस्ती परिसरात राहणाऱ्या गोकुळा विठ्ठल पाटील (वय ४४) या महिलेस अटक केली. आज ( दि.५) विटा येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायालयासमोर तिला हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. कार्वे औद्योगिक वसाहतीतील रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीजमधील एमडी ड्रग तयार करायचा कारखाना २८ जानेवारीरोजी उद्ध्वस्त केला होता. हा कारखाना गोकुळा यांच्या मालकीचा आहे. त्यांना मंगळवारी जिल्हा स्थानिक अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली होती. (Sangli Crime News)
'दै. पुढारी'ने या प्रकरणावर सातत्याने वॉच ठेवला आहे. दोन दिवसांपूर्वी "विट्यातल्या एम.डी. ड्रग कारखाना प्रकरणा चा तपास भरकटतोय का ?" या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले. यांत पोलिसांचे बीटिंग अराउंड द बुश सुरू आहे. त्यांनी तपासाच्या काठ्या इतरत्र बडवण्यापेक्षा या ड्रग फॅक्टरीचा मालक कोण ? यामागे कुणी स्थानिक बिल्डर, उद्योगपती किंवा राजकिय शक्ती आहेत का ? यावर लवकरात लवकर प्रकाश पाडावा, अशी अपेक्षा सामान्य विटेकर नागरिक करीत आहेत असे लिहिले होते. (Sangli Crime News)
या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने हात वर केले आहेत. मात्र, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी औद्योगिक वसाहत प्रशासनाला याबद्दल खुलासा करा असे पत्र दिले आहे, त्याचे काय झाले ? आता पर्यंत याप्रकरणी सात जणांना अटक झालेली आहे. मात्र खरे सूत्रधार अद्याप बाहेरच आहेत. आतापर्यंत अटकेतील आणि पोलिसांच्या रडारवर असलेली मंडळी ही केवळ कटपुतळी बाहुल्या आहेत. मालक ज्या प्रमाणे सांगतील, त्या बरहुकूम ही मंडळी आपापला रोल करीत होती. काही जण ड्रग बनवत होते, तर काही जण विविध शहरात नेऊन विकत होते. पण हा कारखाना नेमका कोणाचा, पैसे कोणी, कोणी लावलेत. हे शोधणे महत्वाचे आहे. शिवाय मेफेड्रॉन एमडी ड्रग तयार करण्यासाठी प्रॉपीलिन क्लोराईड, लिक्वीड ब्रोमाईन, अॅल्युमिनीयम क्लोराईड पावडर, हायड्रोक्लोरिक अॅसिड,क्लोरोफॉर्म, मोनो मिथील अॅमाईन सारखी रसायने किंवा केमिकल्स कुणी आणि कशी आणली ? याचा शोध गरजेचा आहे.
आणखीन काही गोष्टी समोर येत आहेत या कारखान्यामध्ये दररोज काही मंडळी ये जा करीत होती. यात कारखान्यासाठी आवश्यक असलेला बर्फ पुरवठा करणारे दिवसांतून चार वेळा चहा नेऊन देणारे लोक आहेत. या मंडळींना एमडी ड्रग तयार होत असल्याची माहिती मिळाली नव्हती का ? विशेष म्हणजे या ठिकाणी जप्त केलेल्या साधन सामुग्रीमध्ये बर्फ फोडायच्या मशीन्स आहेत. त्यांना बर्फ कोण पुरवायचे ? या सगळ्या स्थानिक गोष्टींचाही तपास करणे महत्त्वाचे आहे.