मंत्रालयात सर्वसामान्यांना प्रवेश करणं कठीण झालं आहे. याचं करणं म्हणजे आता मंत्रालयात प्रवेशासाठी चेहरा पडताळणीची नवीन व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्यांना मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी खूप अडचण येत असून त्यांना मंत्रालयात जाण्यासाठी खूप वेळ बाहेर वाट पाहावी लागते. यावरच प्रश्न उपस्थित करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्रालयातील चेहरा पडताळणी व्यवस्था बंद करावी आणि सर्वसामान्य जनतेला मंत्रालयात प्रवेश मिळावा, अशी मागणी केली आहे.
X वर एक पोस्ट शेअर करत ते म्हणाले आहेत की, ”मंत्रालयात प्रवेशासाठी आता चेहरा पडताळणीची नवीन व्यवस्था करण्यात आली आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसला आहे. त्यामुळे ही व्यवस्था बंद करण्यात यावी ही आमची मागणी आहे.”
वडेट्टीवार म्हणाले की, ”तालुका किंवा जिल्हा पातळीवर प्रश्न सुटले नाहीतर सामान्य जनता मंत्रालयात मंत्री, सचिव यांना भेटण्यासाठी, आपल्या व्यथा मांडण्यासाठी येतात. पण महायुती सरकारला जनतेची भीती का वाटते? मंत्री,सत्ताधारी आमदार यांच्या जवळचे कंत्राटदार, दलाल यांना मंत्रालयात सहज प्रवेश मिळतो पण शेतकरी, मजूर , सामान्य जनतेला मात्र प्रवेश करता येऊ नये, अशी व्यवस्था उभी केली आहे हे अन्यायकारक असल्याने ही व्यवस्था बंद करण्यात यावी.”, अशी मागणी त्यांनी केली आहे.