ठाणे : पुढारी वृत्तसेवा
कृषी विभागासाठी केलेली खरेदीची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर ढकलून चालणार नाही, त्याची सर्वस्वी जबाबदारी ही पालकमंत्री असलेले तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची असून मुंडे यांनी नैतिकतेवर राजीनामा द्यायला हवा अशी भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली. त्यांनी ही उघडपणे भूमिका घेतल्याबद्दल अभिनंदन करीत माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सरनाईक यांना सावध राहण्याचा देखील सल्ला दिला आहे.
तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी खरेदीत २८५ कोटीचा साहित्य खरेदीचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. ते आरोप खोडून काढत मुंडे यांनी ही सर्व खरेदी तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहमतीने झाल्याचे म्हटले आहे. त्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुंडे यांनी नैतिकतेवर राजीनामा द्यायला हवा अशी भूमिका घेतली. माझ्यावर आरोप झाला असता तर क्षणाचा ही विलंब न करता राजीनामा दिला असता अशी उघडपणे भूमिका मांडली. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी गटाचे).सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक याचे एक्स सोशल माध्यमावर अभिनंदन केले आहे.
ते पुढे म्हणतात, आपल्या अंगावर आले की दुसर्याच्या अंगावर ढकलून द्यायचे, ही अनेकांना सवय असते. तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे खापर फोडण्याचा प्रयत्न मंत्रिमंडळातील 'आका' धनंजय मुंढे यांनी केला आहे. भ्रष्टाचार करायला एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. उपद्व्याप करायचे यांनी आणि खापर दुसऱ्यावर फोडायचे ; किती जणांवर असे खापर फोडून जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न करणार? असे ही प्रश्न उपस्थित केले.
अनेकजण उघडपणे भूमिका घ्यायला कचरतात. पण, प्रताप सरनाईक यांनी उघड भूमिका घेतली. नैतिकतेवर राजीनामा द्यावा, असे मंत्रिमंडळातील एका सहकाऱ्याने थेट सुचविले. तरीही, प्रताप सावध रहा !! आतापर्यंत अजित पवार यांचा फोन आला असेल, "प्रताप, शांत बस.!!" असा खोचट टोला हाणत आव्हाड यांनी सरनाईक यांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.