हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेले खोपोलीतील ‘रमाधाम’ हे आजी-आजोबांसाठी हक्काचे ठिकाणच. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज रमाधाम वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील आजी-आजोबांची आस्थेने विचारपूस केली. त्यांच्याशी संवाद साधला. या आजी-आजोबांनीही उद्धव ठाकरे यांना भरभरून आशीर्वाद दिले. यावेळी रश्मी ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हेही उपस्थित होते.
वृद्धांसाठी कार्यरत असणारी रमाधाम संस्था अनेक आजी-आजोबांसाठी आधारवड ठरली आहे. रमाधामचे अध्यक्ष चंदुमामा वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली हे सेवाकार्य अखंड सुरू आहे. रमाधामची नव्याने उभारलेली वास्तू, परिसरातील निसर्ग, रमाधाममध्ये मिळणाऱ्या सुविधा यामुळे आजी-आजोबांसाठी हे ठिकाण पर्वणी ठरत आहे.
आज उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी रमाधाम वृद्धाश्रमास भेट दिली आणि व्यवस्थेची पाहणी केली. रमाधाममधील आजी-आजोबांशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. त्यांची विचारपूस केली. सेवेत असणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशीही उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी संवाद साधला. हे सेवाकार्य असेच अखंड सुरू राहू द्या, अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, रमाधामचे अध्यक्ष चंदुमामा वैद्य, डॉक्टर व कर्मचारीवर्ग उपस्थित होता.