ऑलिम्पिक कांस्य पदक विजेत्या महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेने 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील नेमबाजीच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये अपेक्षेप्रमाणे अंतिम फेरी गाठली. उद्या गुरुवारी सकाळी 10 वाजता अंतिम फेरीचा थरार रंगणार असून तो सोन्यावर नेम लावत महाराष्ट्राच्या पदक तालिकेत सुवर्णाची भर टाकण्यास सज्ज झाला आहे.
महाराणा प्रताप क्रीडा संकुलातील त्रिशूल शूटिंग रेंजवर सुरू असलेल्या या स्पर्धेत कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेने एकूण 588 गुणांची कमाई करीत पाचव्या क्रमांकाने अंतिम फेरी गाठली. त्याने नीलिंग (गुडघ्यावर बसून) पोझिशनमध्ये 195, प्रोन (झोपून) पोझिशनमध्ये 200, तर स्टँडिंग (उभे राहून) पोझिशनमध्ये 193 अशी एकूण 588 गुणांची कमाई करीत अंतिम फेरीची पात्रता मिळविली. पात्रता फेरीत मध्य प्रदेशच्या प्रताप सिंग तोमरने 598 गुणांसह अव्वल स्थान मिळविले. चैन सिंग (594), नीरज कुमार (591) व निशान बुधा (589) या सेनादलाच्या नेमबाजांनी अनुक्रमे दुसऱया, तिसऱया व चौथ्या क्रमांकासह अंतिम फेरीचे तिकीट बुक केले.