गर्भपाताच्या गोळ्या पुरविणारी औषध दुकानदारांची यंत्रणा फुलेवाडीतील बोगस डॉक्टरामुळे उघडकीस आली आहे.
Published on
:
06 Feb 2025, 1:39 am
Updated on
:
06 Feb 2025, 1:39 am
कोल्हापूर : बेकायदेशीर गर्भपात करणार्या बोगस डॉक्टरांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिपशन शिवाय पुरविण्यात येणार्या गर्भपाताच्या गोळ्या पुरविणारी औषध दुकानदारांची यंत्रणा फुलेवाडीतील बोगस डॉक्टरामुळे उघडकीस आली आहे. गर्भपातासाठी वापरण्यात येणारे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेगनन्सी (एमटीपी) किट बोगस डॉक्टरांनी नेमलेल्या एजंटाना राजरोजसपणे ठराविक औषध विक्रेत्यांकडून पुरविण्यात येत असल्यामुळे ही साखळी तोडण्याचे आव्हान यंत्रणेपुढे आहे.
जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई होत असली तरी त्यांची संख्या काही कमी होत नाही. उलट जिल्ह्यातून रोज एक नवीन बोगस डॉक्टरची तक्रार आरोग्य विभागाकडे येत असते. आजपर्यंत कारवाई केलेल्या बोगस डॉक्टरांमध्ये ग्रामीण भागात दवाखाना चालविणार्या डॉक्टरांची संख्या अधिक आहे; परंतु आता हे लोण शहरापर्यंत आले असल्याचे फुलेवाडी येथील सापडलेल्या बोगस डॉक्टरवरून दिसून येते.
गर्भलिंग निदान चाचणीला कायद्याने बंदी घालण्यात आली असली तरी हे प्रकार वाढतच आहेत. त्याचप्रमाणे बेकायदेशीरपणे गर्भपात करणे हा देखील गुन्हाच आहे. वैद्यकीय प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत गर्भपात करण्यासाठी आरोग्य विभागाची परवानगी घेणे आवश्यक असते. गर्भपातासाठी निकष ठरविण्यात आले आहेत. हे निकष पूर्णपणे पाळले जात नसल्यामुळे परवानगी घेणे अवघड असते. त्यामुळे आज जवळपास निम्मे गर्भपात हे असुरक्षितरित्या केले जातात. यामध्ये धोका अधिक असतो; परंतु कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी पर्यायी मार्गांचा म्हणजे बोगस डॉक्टरांचा आधार घेतला जातो. यापूर्वी उघडकीस आलेल्या प्रकारामुळे डॉक्टरांची झालेली परिस्थिती पाहून कारवाईच्या भीतीने तज्ज्ञ डॉक्टर असल्या गोष्टीपासून लांब राहण्याचा प्रयत्न करतात. त्याचा फायदा घेऊन बोगस डॉक्टर यामध्ये अधिक काम करत असतात. यासाठी लागणार्या औषधांसाठी या बोगस डॉक्टरनी आपल्या एजंट मार्फत जिल्ह्यात काही औषध विक्रेत्यांनी हाताशी धरले असल्याचे उघड झाले आहे. बोगस डॉक्टर आणि गर्भपाताची औषध पुरविणारी साखळी गावागावापर्यंत पोहोचली आहे. ही साखळी तोडण्याचे आव्हान सध्या प्रशासनासमोर आहे.