महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेत वेळोवेळी अनक बदल झाले असून आता राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये घरोघरी जाऊन पडताळणी सुरू आहे. त्यानंतरच अंतिम यादी ठरवावी, असे आदेश देण्यात आले होते. ज्या बहिणींकडे चारचाकी वाहन असेल त्यांची धास्ती वाढली आहे, कारण त्यांचे अर्ज थेट बाद होऊ शकतात. ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांसाठी महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची’ जुलै महिन्यात घोषणा केली. त्याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांच्या अकाऊंटमध्ये दर महिन्याल 1500 रुपये जमा होतात. जुलै ते जानेवारी अशा 7 महिन्यांचे एकूण 10 हजार 500 रुपये आत्तापर्यंत कोट्यवधी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. तर विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यास हा हप्ता 2100 करू असं आश्वासनंही महायुतीच्या नेत्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान दिलं होतं. त्यामुळे बहिणींना 2100 चा हप्ता कधी मिळणार असा सवालही अनेक बहीणींच्या मनात आहे. त्यावर लवकरच सरकारचा निर्णय अपेक्षित आहे.
मात्र याच दरम्यान राज्यातील लाडक्या बहिणींची धाकधूक वाढवणारी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेचे निकष वारंवार बदलले जात आहेत. त्यातच आता लाडक्या बहिणींचे टेन्शन आणखी वाढलं आहे. कारण ज्या महिलांकडे किंवा ज्यांच्या घरात चारचाकी वाहन असेल त्यांचे अर्ज थेट बाद होणार असून त्यांचे नाव योजनेतून वगळण्यात येणार आहे. यासाठी पुढील आठवड्यापासून पुण्यात पडताळणी सुरू होणार आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ रद्द होणार
मिळालेल्या माहितीनुसार, घरात चारचाकी असणे हे लाडक्या बहिणींना महागात पडणार असून अनेक जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेची पडताळणी सुरू झाली आहे. तर पुढच्या आठवड्यापासून पुण्यामध्ये ही पडताळणी सुरू होणार आहे. सोमवारपासून पुण्यात लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू होईल. ज्या लाभार्थी महिलांच्या घरात चारचाकी वाहन असल्याचे निष्पन्न होईल, त्या बहिणींची नावे लाडकी बहीण योजनेतून रद्द करण्यात येणार आहेत. या पडताळणीत जर लाभार्थी महिला एकत्रित अथवा विभक्त कुटुंबात राहत असतील आणि पती अथवा सासऱ्यांच्या नावावर चारचाकी असेल तर त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. जर त्या महिलेच्या नावावर चारचाकी असल्याचे निष्पन्न झाले तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ रद्द केला जाणार आहे. यामुळे लाडक्या बहिणींची धाकधूक वाढली आहे.
आत्तापर्यंत जिल्ह्यातील 75 हजार बहिणींच्या घरात चारचाकी गाड्या आढळल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारपासून पुण्यात ही तपासणी केली जाणार आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातील 38 बहिणींनी आत्तापर्यंत माघार घेतली आहे. आधी 8 महिलांनी पैसे परत केले होते, त्या पाठोपाठ आता 30 महिलांनी पैसे परत करण्याची तयारी दर्शवली आहे.
पुण्यातून 21 लाख बहिणींनी केले अर्ज
लाडकी बहीण योजनेसाठी पुण्यात 21 लाख बहिणींनी अर्ज केले होते. तसेच संपूर्ण राज्यातून अडीच कोटींहून अधिक महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ठरल्या. त्यांना दरमहा 1500 रुपये मिळतात. मात्र या योजनेत निकषांमध्ये न बसलेल्या महिलांची संख्या अधिक होती. ही संख्या कमी करण्यासाठी महिला आणि बाल कल्याण विभागाकडून पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. तसेच या योजनेचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांनाच मिळावा आणि 2100 रुपयांची अंमलबजावणी करताना त्याचा ताण सरकारी तिजोरीवर येऊ नये, म्हणून ही खबरदारी घेतली जात आहे.