Published on
:
06 Feb 2025, 5:02 am
Updated on
:
06 Feb 2025, 5:02 am
भाजपला सोडचिठ्ठी देऊन शरद पवारांच्या साथसंगतीत राजकीय प्रवास अखंड सुरू ठेवण्याचा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा प्रयोग फसल्यानंतर त्यांना घरवापसीचे वेध लागल्याची चर्चा आहे. याच अनुषंगाने खडसे यांनी मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येते. आपली भेट मतदारसंघातील कामाबाबत होती, राजकीय नव्हे, असा खुलासा नाथाभाऊ करीत असले तरी घरवापसी करून राजकीय वर्तुळ पूर्ण करण्याच्या ते तयारीत असल्याचा खान्देशभर बोलबाला आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचे भाग्य बदलले आणि आपणच मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असल्याचा ठाम विश्वास खडसे यांना वाटू लागला. तथापि, दिल्लीच्या तख्तावर बसलेल्या मोदी-शाह जोडगोळीची देवेंद्र फडणवीस ही पसंती ठरली आणि खडसे शीर्षस्थ नेते म्हणून साईडट्रॅक झाले. मंत्रिमंडळात असूनही त्यांनी फडणवीस यांना प्रत्यक्षाप्रत्यक्ष लक्ष्य करण्याची एकही संधी सोडली नाही. पुढे पुण्यातील एका भूखंड खरेदी प्रकरणी खडसे यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. त्या काळात त्यांच्या पत्नी आणि जावयाविरोधातही काही गुन्हे दाखल झाल्याने अवघे कुटुंबच अडचणीत आले. त्या उद्वेगातून खडसे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून नवा राजकीय प्रवास सुरू केला. पवार यांनी त्यांना विधान परिषदेवर घेऊन, तर कन्या रोहिणी यांना पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी बसवून दोहोंचे राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला. तथापि, पुढे पक्षाची शकले होऊन अजित पवार यांनी स्वतंत्र चूल मांडली आणि त्यानंतरच्या घडामोडीत खान्देशच्या राजकारणात खडसे परिवार पुन्हा एकाकी पडला.
एकीकडे खडसे यांचे राजकारण लोप पावत असताना दुसरीकडे त्यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना थेट केंद्रात मंत्रिपद देऊन भाजपने नाथाभाऊंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. भाजप सोडल्यानंतर खडसे यांच्या निशाण्यावर फडणवीस यांच्यासह गिरीश महाजन हे राहिले. मात्र, राजकीयदृष्ट्या पुन्हा उभे राहायचे तर भाजपशिवाय तरणोपाय नसल्याची जाणीव खडसे यांना झाली असावी. किमान, कन्या रोहिणी यांच्या राजकीय भवितव्यापोटी तसे करणे खडसे यांना अपरिहार्य वाटत असावे. या दृष्टिकोनातून नाथाभाऊ हे देवाभाऊंना भेटल्याचे बोलले जाते. आता फडणवीस नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
फडणवीसविरोधी त्रिमूर्ती नामोहरम ?
राज्याच्या राजकारणात देवेंद्र पर्वारंभ झाल्याची बाब ज्या त्रिमूर्तीला खटकली होती, त्यामध्ये एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांचा प्रामुख्याने समावेश होता. यापैकी खडसे आणि मुंडे यांनी अनेकदा प्रत्यक्षाप्रत्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान केले. या त्रिमूर्तींपैकी खडसे यांना पक्षाबाहेर जाण्याची वेळ आली तर मुंडे-तावडे यांच्या वाटेला राजकीय विजनवास आला. पंकजा यांना तर लोकसभा अन् विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारावा लागला. तावडे यांना राज्याची चौकट ओलांडून राष्ट्रीय राजकारणात जावे लागले. पंकजा यांना फडणवीस यांचे नेतृत्व मान्य करावे लागले. राहता राहिलेल्या खडसे यांनीही फडणवीस यांची पक्षातील मक्तेदारी मान्य करून उद्याच्या भाजप पुनर्प्रवेशातून राजकीय वहिवाट निष्कंटक करून घेतल्यास नवल नाही.