राहुल सोलापूरकर यांच्याविरोधात पुण्यात आंदोलनPudhari
Published on
:
06 Feb 2025, 4:51 am
Updated on
:
06 Feb 2025, 4:51 am
पुणे : ज्येष्ठ चित्रपट अभिनेते आणि भांडारकर संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य राहुल सोलापूरकर यांच्याविरोधात पुण्यामध्ये बुधवारी अखंड मराठा समाजासह शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. दरम्यान, अभिनेते सोलापूरकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर माफी मागितली आहे.
एका मुलाखतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्य्राहून सुटकेबाबत सोलापूरकर यांनी आक्षेपार्ह शब्द वापरला होता. त्याचा निषेध करत अखंड मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी भांडरकर संस्थेसमोर आंदोलन केले. त्यांनी सोलापूरकर यांच्याविरोधात घोषणा देत त्यांचा राजीनामा घ्यावा, अशा आशयाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. सायंकाळी 5 वाजता हे आंदोलन सुरू झाले. कार्यकर्त्यांनी सोलापूरकर यांच्याविरोधात पोलिस आयुक्त संदीपसिंग गिल यांच्याकडे तक्रार केली. देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले. दरम्यान, सोलापूरकर हे भांडारकर संस्थेच्या विश्वस्त मंडळावर आहेत.
दोन दिवसांत संस्थेने त्यांचा राजीनामा घेतला नाही, तर आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा अखंड मराठा सेवक अनिकेत देशमाने यांनी दिला. याबाबत भांडारकर संस्थेच्या पदाधिकार्यांनी भाष्य करणे टाळले.
राष्ट्रवादीकडून सोलापूरकर यांचा निषेध
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) पुणेचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार पेठेतील समाधान चौक येथे अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.
शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन
शिवसेना ठाकरे गटाकडून सोलापूरकर यांच्या निवासस्थान परिसरात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी सोलापूरकर यांचा तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी पोलिसांनी त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. सोलापूरकर यांना पोलिस चौकीत आणा, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली नाक घासून माफी मागायला लावा, शिवरायांचा अवमान करणार्या सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशा मागण्या शिवसैनिकांनी केल्या. आंदोलनात महिला कार्यकर्त्यांचा लक्षणीय सहभाग होता.