करुणा शर्मा यांचा अखेर मोठा विजय झाला आहे. राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार केल्याचा आरोप कोर्टाने अंशत: मान्य केला आहे. तसेच या प्रकरणी करुणा शर्मा यांना महिन्याला 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेशही कोर्टाने धनंजय मुंडे यांना दिले आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा झटका आहे. आधीच आरोपांमुळे अडचणीत आलेल्या धनंजय मुंडे यांचा पाय आणखीनच खोलात गेला आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी तर कोर्टाचा निकाल येताच धनंजय मुंडे यांनी तात्काळ राजीनामा देण्याची मागणी केली आहे. तसेच मुंडे यांच्या पापाचा घडा भरत आल्याचंही तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.
तृप्ती देसाई यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली आहे. खरं तर करुणा शर्मांना न्याय मिळाला असं म्हणावं लागेल. करुणा शर्मा वारंवार सांगत होत्या मी धनंजय मुंडेंची पहिली पत्नी आहे. माझ्यावर घरगुती हिंसाचार झाला आहे. मला त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो. मला खर्च दिला जात नाही. कोणतीही दखल घेतली नसल्याने त्या न्यायालयात गेल्या. कोर्टाने आज त्यांना न्याय दिला. त्यांची पोटगी असेल किंवा महिन्याला त्यांच्या मुलीचा खर्च असेल तो देण्याचं मान्य केलं आहे. मुंडेंनी आता तरी आरोप मान्य केलं पाहिजे. कोर्टानेच त्यांना दोषी ठरवलं आहे, असं तृप्ती देसाई म्हणाल्या.
आता करुणा मुंडे म्हणा
धनंजय मुंडे यांचे अनेक प्रकरण समोर येत आहेत. याबाबत न्यायालयीन लढाई लढली आणि पुरावे असतील तर 100 टक्केंना योग्य न्याय मिळेलच, असं सांगतानाच करुणा शर्मा या मी करुणा शर्मा नाही तर करुणा मुंडे आहे, असं सांगायच्या. त्यामुळे त्यांना आता करुणा मुंडेच म्हटलं पाहिजे, असं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.
नैतिकतेने राजीनामा द्या
हे गंभीर प्रकरण आहे. आतापर्यंत धनंजय मुंडेंनी राजकीय दबावापोटी आणि पदाचा गैरवापर करत अनेक कृत्य केली आहेत. मला वाटतं आता पापाचा घडा भरत आला आहे. खंडणी प्रकरणातही मुंडेंचीच माणसं आहेत. संतोष देशमुख हत्या झाली त्यात वाल्मिक कराड हा मुंडेंचा उजवा हात आहे, हे सर्वांना माहीत आहे. ही टोळी त्यांच्या जवळची होती हे माहीत आहे. त्यामुळे मुंडे यांनी नैतिकतेने राजीनामा द्यायला हवा होता. त्यांनी दिला नाही. सर्व पुरावे आले आहेत. अजूनही त्यांचा राजीनामा होत नाही, असं त्यांनी सांगितलं.
ही तर सुरुवात
करुणा शर्मा प्रकरणात झटका बसणं ही तर सुरुवात आहे. मुंडेंना कोर्टाचा हा पहिला झटका मिळाला आहे. मुंडेंचा राजीनामा होणं गरजेचं आहे. कोर्टाचा निर्णय पॉझिटिव्ह आला. त्यामुळे या पुढचे निर्णय सकारात्मक होतील. त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा होणं गरजेचं आहे, असंही त्या म्हणाल्या.