आज संध्याकाळपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करणार : पणन महासंघाच्या संचालकांचे आश्वासन…
चंद्रपूर (Chandrapur) : जिल्हयातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे धान खरेदीचे (Paddy Purchase) पैसे संबंधीत शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्याबाबतची मागणी माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र राज्य सहकार पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक हनुमंत पवार (Hanumant Pawar) यांच्याकडे केली आहे. धान खरेदीचे सदर थकीत पैसे 6 फेब्रुवारी रोजी संध्याकाळ पर्यंत शेतकऱ्यांच्या (Farmers) खात्यात जमा करण्याचे आश्वासन हनुमंत पवार यांनी आ. मुनगंटीवार यांना दिले आहे.
या संदर्भात आ. मुनगंटीवार यांनी अन्न नागरी पुरवठा विभागाच्या (Food Civil Supplies Department) सचिव जयश्री भोज यांच्याशी देखील चर्चा केली. चंद्रपूर जिल्हयातील एकुण 16 हजार 669 धान उत्पादक शेतकऱ्यांचे धान खरेदीचे रुपये 93 कोटी 90 लाख रक्कम थकीत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे.
याबाबत अनेक शेतकऱ्यांनी आम. सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेत त्यांची कैफियत मांडली. आम. सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ (Maharashtra State Cooperative Marketing Federation) मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक हनुमंत पवार यांच्याशी त्वरित संपर्क साधला व चर्चा केली. शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत असल्यामुळे याविषयी संवेदनशील रित्या कार्यवाही करावी असे आ. मुनगंटीवार म्हणाले. हनुमंत पवार यांनी 6 फेब्रुवारी रोजी संध्याकाळ पर्यंत शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल, असे आश्वासन आ. सुधीर मुनगंटीवार (A. Sudhir Mungantiwar) यांना दिले.