Published on
:
06 Feb 2025, 12:45 pm
Updated on
:
06 Feb 2025, 12:45 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : Ravindra Jadeja 600 Wickets : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू रवींद्र जडेजाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात खळबळ उडवून दिली. 14 महिन्यांनंतर एकदिवसीय सामना खेळणाऱ्या जड्डूने शानदार गोलंदाजी केली. त्याने 2.90 च्या इकॉनॉमीने 9 षटकांत फक्त 26 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्याने जो रूट, जेकब बेथेल आणि आदिल रशीद यांना बाद केले. या कामगिरीसह जडेजाने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 600 विकेट्स पूर्ण केल्या.
या सामन्यात इंग्लंडचा प्रमुख फलंदाज जो रूटने एकदिवसीय संघात पुनरागमन केले, परंतु तो काही विशेष कामगिरी करू शकला नाही. तो 31 चेंडूत फक्त 19 धावा काढून बाद झाला. जडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 12 व्यांदा रूटला बाद केले.
दिग्गजांच्या यादीत समावेश
जडेजाने 352 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात 600 विकेट्स पूर्ण केल्या. त्याने 2009 मध्ये भारतासाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून फक्त अनिल कुंबळे (953), रविचंद्रन अश्विन (765), हरभजन सिंग (707) आणि कपिल देव (687) यांनीच जास्त विकेट्स घेतल्या आहेत. 600 विकेट्स घेणारा जडेजा हा पहिलाच भारतीय डावखुरा फिरकी गोलंदाज ठरला आहे. या खेळाडूने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6000 पेक्षा जास्त धावा आणि 600 विकेट्स घेणारा जडेजा जगातील सहावा खेळाडू बनला आहे. त्याच्याशिवाय कपिल देव (भारत), वसीम अक्रम (पाकिस्तान), शॉन पोलॉक (द. आफ्रिका), डॅनियल व्हेटोरी (न्यूझीलंड) आणि शाकिब अल हसन (बांगलादेश) यांनी ही कामगिरी केली आहे.
याशिवाय, जडेजा भारत आणि इंग्लंडमधील एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाजही बनला आहे. त्याच्या नावावर आता 41 विकेट्स जमा झाल्या आहेत. जडेजाने जेम्स अँडरसनला मागे टाकले आहे. अँडरसनच्या नावावर 40 विकेट्स आहेत.