अचानक काही खाण्याची इच्छा झाली की आपण लगेच घरबसल्या किंवा अगदी ऑफिसमधूनही आपले आवडे पदार्थ ऑनलाइन अॅपद्वारे मागवू शकतो. या ऑनलाइन अॅपमध्ये ‘झोमॅटो’ हे तर नावाजलेलं अॅप. अगदी प्रत्येकाच्या फोनमध्ये सापडणारं असं हे अॅप आहे. किंवा अगदी गुगलवर जरी ‘झोमॅटो’ सर्च केलं तरी देखील त्याची लिंक ओपन व्हायची. पण आता असं होणार नाहीये का? आता गुगलवर Zomato सर्च केल्यावर जेवण ऑर्डर करता येणार नाहीये का? असे प्रश्न निर्माण होत आहेत.
कारणही तसच आहे. कंपनीने आपल्या नावात बदल केला आहे. फूड टेक कंपनी झोमॅटोने आपले नाव बदलून ‘ईटर्नल’ केले आहे. कंपनीच्या संचालक मंडळानेही या बदलाला मान्यता दिली आहे. कंपनीने 6 फेब्रुवारी रोजी स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली आहे. झोमॅटोचे ग्रुप सीईओ आणि सह-संस्थापक दीपिंदर गोयल म्हणालेत की, “जेव्हा आम्ही ब्लिंकिट विकत घेतले तेव्हा त्यांनी ‘ईटर्नल’ हे नाव वापरण्यास सुरुवात केली. हे कंपनी आणि ब्रँड/अॅपमधील फरक ओळखण्यास मदत करते.”
नाव का बदलण्यात आले?
गोयल पुढे म्हणाले की, झोमॅटो मोठे झाल्यावर ते कंपनीचे नाव बदलून ईटर्नल करतील. म्हणून, आताच झोमॅटो लिमिटेडचे नाव बदलून ‘ईटर्नल लिमिटेड’ करण्यात आलं आहे. पण झोमॅटो अॅपचे नाव बदलले जाणार नाही, असेही गोयल यांनी म्हटलं. तथापि, स्टॉक टिकरचे नाव झोमॅटो वरून ईटर्नल असे बदलले जाईल. सध्या ईटर्नलचे चार मुख्य व्यवसाय असतील. पहिला झोमॅटो, दुसरा ब्लिंकिट, तिसरा डिस्ट्रिक्ट आणि चौथा हायपर प्युअर असेल.
ईटर्नल हे एक शक्तिशाली नाव आहे.
गोयल पुढे म्हणाले की, ईटर्नल हे एक शक्तिशाली नाव आहे. हे एक अतिशय आव्हानात्मक नाव आहे. ‘शाश्वत’ या नावात श्रद्धा आणि विरोधाभास दोन्ही आहेत. हे फक्त नाव बदलण्यापुरतेच नसून हे एक मिशन स्टेटमेंट आहे. 20 जानेवारी रोजी कंपनीने आपल्या भागधारकांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की ते मोठ्या प्रमाणात मंदीचा सामना करत आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच ही परिस्थिती सुरु झाली असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
कंपनीच्या नफ्यात वाढ
झोमॅटोचा कंसॉलिडेटेड प्रॉफिट आफ्टर टॅक्स (PAT)वार्षिक आधारावर 57 टक्क्यांनी घसरून 59 कोटी रुपयांवर आला आहे. तर गेल्या वर्षी याच कालावधीत ते 138 कोटी रुपये होता. तथापि, कंपनीचे उत्पन्न 64 टक्क्यांनी वाढून 5,404 कोटी रुपये झाले. हे गेल्या वर्षीच्या 3288 कोटी रुपयांपेक्षा आणि मागील तिमाहीतील 4799 कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. मंडळाने नाव बदलण्यास मान्यता दिली. आता कंपनीच्या भागधारकांच्या मंजुरीची वाट पाहत असल्याचं म्हटलं जात आहे.