नवी दिल्ली : भारतरत्न सचिन तेंडुलकरांनी पत्नी अंजली आणि मुलगी सारा तेंडुलकरसह गुरूवारी सहकुटुंब राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. राष्ट्रपती भवन परिसरात राष्ट्रपतींसोबत फेरफटकाही मारला. सचिन तेंडुलकरांनी कसोटी क्रिकेटमधील आपली एक जर्सी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेट दिली.
राष्ट्रपती भवनात सचिन तेंडुलकरांचे एक विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये खेळाडू होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची देखील उपस्थिती होती. सचिन तेंडुलकरांनी सांघिक कार्य, इतरांची काळजी घेणे, इतरांचे यश साजरे करणे, कठोर परिश्रम करणे, मानसिक व शारीरिक कणखरता विकसित करणे, यांसह व्यक्तिमत्व विकास आणि जीवनात बदल घडवणाऱ्या गोष्टी या संदर्भात मार्गदर्शन केले. भविष्यातील स्पोर्ट्स-स्टार हे देशाच्या दुर्गम भागातून, आदिवासी समुदायांमधून आणि विशेषाधिकार नसलेल्या ग्रामीण भारतातून येतील, असे सचिनने यावेळी म्हटले.