यवतमाळ : राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उईके यांच्या संकल्पनेतून शुक्रवार दि.७ फेब्रुवारी रोजी आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प कार्यालय ते मंत्रालयातील वरीष्ठ अधिकारी शासकीय आश्रमशाळेत एक दिवस मुक्काम करणार आहे. या भेटीत ते सोई-सुविधांची पाहणी व विद्यार्थ्यांशी संवाद साधतील.
पुसद एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत एकुण ७ शासकीय आश्रमशाळा असून त्याठिकाणी अनुसूचित जमातीचे सुमारे २ हजार ५६३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सातही आश्रमशाळांमध्ये मंत्रालयीन अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनीधी, आदिवासी विकास आयुक्तालय, अपर आयुक्त व प्रकल्प अधिकारी तसेच प्रकल्प कार्यालयातील अधिकारी एक दिवस मुक्कामी राहणार आहे.
त्याचप्रमाणे राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उईके व राज्यमंत्री इंद्रनिल नाईक हे राज्यातील शासकीय आश्रमशाळेमध्ये एक दिवस मुक्कामी थांबणार आहेत. आ.किसनराव वानखेडे हे देखील शासकीय आश्रमशाळेत एक दिवस मुक्कामी राहणार असून या मुक्कामात आश्रमशाळा भेटीदरम्यान विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत.
मुक्काम दरम्यान विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासोबतच आश्रमशाळेतील मुलभुत सोई-सुविधांची पाहणी केली जाणार आहे. पुसद प्रकल्प कार्यालयस्तरावरुन अधिकाऱ्यांच्या भेटीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुसार अधिकारी नेमून दिलेल्या आश्रमशाळेत पुर्णवेळ उपस्थित राहून सोई-सुविधांची तपासणी तसेच विद्यार्थ्यांसोबत हितगुज करतील. तपासणी अहवाल सादर करतील.
अहवालाचे अवलोकन केल्यानंतर शाळानिहाय कृती कार्यक्रम तयार करुन प्रकल्प अधिकारी यांच्या अभिप्रायासह अहवाल वरीष्ठ कार्यालयास सादर करण्यात येणार आहे. यातून शासकीय आश्रमशाळांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे, असे पुसदचे प्रकल्प अधिकारी अमोल मेटकर यांनी कळविले आहे.