मुंबईतील वांद्रे भागातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित करण्यात येत असलेल्या ‘दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’च्या आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील वांद्रे पोलिसात सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या चित्रपट आघाडी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष समीर दीक्षित यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे परिसरात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार आयोजित केला जात असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाच्या चित्रपट आघाडी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष समीर दीक्षित यांना मिळाली होती. येत्या 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे, असे त्यात नमूद करण्यात आले होते. हा कार्यक्रम इंटरनॅशनल टुरिझम फेस्टिव्हल प्रायव्हेट लिमिटेडकडून आयोजित केला जाणार होता.
इंटरनॅशनल टुरिझम फेस्टिव्हल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक अनिल मिश्रा आणि त्यांची पत्नी आहेत. अनिल मिश्रा यांनी इंटरनेटच्या माध्यामातून या कार्यक्रमाचा प्रचार केला. त्याने त्यांच्या वेबसाईटवर राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि पर्यटन मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यातर्फे देण्यात आलेल्या शुभेच्छा अपलोड केल्या आहेत. तसेच हा कार्यक्रम राष्ट्रपती भवनातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रपती भवनाच्या पुरस्काराच्या कार्यक्रमाचा भाग आहे असे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप समीर यांनी केला आहे.
प्रति जोडप्यासाठी 2.5 लाख रुपयांपर्यंत तिकीट दर
अनिल मिश्रा याने व्हॉट्सॲप आणि कॉलद्वारे लोकांना हा केंद्र सरकारचा कार्यक्रम असल्याचे सांगितले. हे सांगून त्याने 12 मोठ्या कंपन्यांकडून प्रायोजकत्व देखील घेतले. याशिवाय उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, पंजाब आणि महाराष्ट्र राज्यांच्या पर्यटन विभागांकडूनही प्रायोजकत्व घेण्यात आले. तसेच अनिल मिश्राने लोकांना या कार्यक्रमासाठी बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्री उपस्थित राहतील, असेही सांगितले. या कार्यक्रमासाठी त्याने प्रति जोडप्यासाठी 2.5 लाख रुपयांपर्यंत तिकीट दर ठेवले असून असून त्याची विक्री वेबसाईटद्वारे केली जात आहे. मात्र इंटरनॅशनल टुरिझम फेस्टिव्हल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक अनिल मिश्रा याने सरकारची फसवणूक केली आहे, असा दावा समीर यांनी केला आहे.
आरोपांची चौकशी सुरू
या प्रकरणी इंटरनॅशनल टुरिझम प्रायव्हेट लिमिटेड संचालक अनिल मिश्रा आणि त्यांचा मुलगा अभिषेक मिश्रा आणि इतरांविरुद्ध बीएनएस कलम 318 (4), 319 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या आरोपांची चौकशी सुरू आहे. भारतीय जनता पक्षाच्या चित्रपट आघाडी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष समीर दीक्षित यांच्या वक्तव्याच्या आधारे एफआयआर नोंदविण्यात आला आहे. आम्ही समीर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आणि जबाबाच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे आणि निवेदनात केलेल्या दाव्यांचा तपास करत आहोत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.