उत्तर प्रदेशातील अयोध्या जिल्ह्यातील मिल्कीपूर विधानसभा जागेसाठी बुधवारी पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी मतदान केंद्रांवर महिला रांगेत उभ्या असताना, त्यांचे बुरखे उचलून त्यांची ओळख पटवली जात होती, असा आरोप समाजवादी पक्षाने केला आहे. पक्षाने याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली आहे. हाच मुद्दा समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेत उपस्थित करत संपात व्यक्त केला आहे.
राज्यसभेत बोलताना जया बच्चन म्हणाल्या की, ”राष्ट्रपती त्यांच्या भाषणात महिला सक्षमीकरणाबद्दल बोलल्या. ही खूप चांगली गोष्ट आहे पण प्रत्येक महिलेला एक सारखं वागवलं जात नाही. काल उत्तर प्रदेशात निवडणुकीदरम्यान महिला रांगेत उभ्या असताना, त्यांचे बुरखे उचलून त्यांची ओळख पटवली जात होती. दिल्लीतही असेच घडले. बुरखा न घालणाऱ्यांची कोणतीही तपासणी केली जाणार नाही आणि जर तुम्ही बुरखा घातलात तर बुरखा उचलून तुम्ही महिला आहात की नाही याची तपासणी केली जाईल.”